प्रतिनिधी/ बेळगाव
राष्ट्रीय हरित लवादचे चेअरमन निवृत्त न्यायमूर्ती सुभाष आडी हे सोमवारी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवारी त्यांनी बेळगाव जिल्ह्याला धावती भेट दिली. त्यानंतर ते पुन्हा हुबळीला गेले असून सोमवारी महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांना भेट देऊन पाहणी करणार असल्याचे पर्यावरण विभागातून सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रथम बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर ते विविध प्रकल्पांना भेट देण्याची शक्यता आहे. सुभाष आडी हे हरित लवादचे चेअरमन आहेत. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काम केले आहे. बेंगळूर येथील बीबीएमपी येथेही काम केले आहे. महानगरपालिकेने विविध प्रकल्प राबविले आहेत. मात्र, त्यामध्ये आधुनिकता आणण्याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत.
विशेषकरून घनकचरा यावर अधिक लक्ष दिले जाणार आहे. तुरमुरी येथील कचरा डेपोमध्ये प्रकल्प राबविण्यात येत असले तरी अजूनही बऱ्याच कचऱ्यावर प्रक्रिया करणे अशक्य झाले आहे. घन कचऱ्यावर प्रक्रिया करताना पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आव्हान आहे. त्याला कशाप्रकारे तोंड द्यावे, याचे मार्गदर्शन ते करणार आहेत. महानगरपालिकेतील पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ते येणार असल्याची माहिती दिली आहे. महानगरपालिकेनेही त्यांना विविध प्रकल्पांना भेट देण्याचे नियोजन केले आहे.









