कराड :
सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी धुमस्टाईल विट्यातून कराडात येत धुमस्टाईल चोऱ्या करणाऱ्या संशयिताला कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. संशयिताने कराड, मलकापूर, सैदापूर हद्दीत सलग केलेले सात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याकडून तब्बल 7 लाख 89 हजारांचे 81 ग्रॅम वजनाचे चोरीचे सोने हस्तगत करण्यात आले आहे अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
संभाजी गोविंद जाधव (रा. चंद्रसेननगर, सांगली रोड, विटा, जि. सांगली) असे संशयिताचे नाव आहे. विशेष म्हणजे संशयिताने स्कुटीवरून या सर्व चोऱ्या केल्या आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड शहर व परिसरात धुमस्टाईलने चोऱ्या करण्याचे प्रमाण वाढले होते. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संशयिताच्या मागावर होते. पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक डॉ. कडूकर यांनी संशयिताच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक कार्यरत होते. एक संशयित स्कुटीवरून चोऱ्या करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, अशोक भापकर यांनी संशयिताची माहिती घेऊन त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. संशयित विट्याचा असल्याचे समजल्यावर त्याच्या वर्णनावरून त्याचा शोध घेतला जात होता. उपनिरीक्षक सतिश आंदेलवार, कृष्णा डिसले, पोलीस नाईक सज्जन जगताप, अनिल स्वामी, कुलदीप कोळी, संदीप कुंभार, संतोष पाडळे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, धीरज कोरडे, प्रशांत वाघमारे, मोहसिन मोमीन, दिग्वीजय सांडगे, संग्राम पाटील, सोनाली पिसाळ या पोलिसांची वेगवेगळी पथके तपासासाठी सातत्याने संशयितांची झाडाझडती घेत होती. यामध्ये संभाजी गोविंद जाधव हा संशयित पोलिसांच्या हाताला लागला. सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक आधारावर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली. चौकशीत त्याने कराड परिसरात 7 धुमस्टाईल चोऱ्या केल्याचे कबुल केले. त्याने चोरीचे सोने विकलेल्या एका सराफाकडून 7 लाख 89 हजाराचे सोने हस्तगत करण्यात आले. सराफाकडेही पोलीस चौकशी करत आहेत.
- कर्जबाजारी झाल्याने चोरीचा मार्ग
संशयिताने पोलिसांना दिलेल्या कबुलीनुसार त्याच्यावर सावकाराचे मोठे कर्ज झाले होते. या कर्जातून बाहेर पडण्यासाठी तो स्कुटीवरून कराडला येऊन या परिसरात रस्त्याकडेने निघालेल्या वृद्ध महिलांना हेरून त्यांच्या गळ्यात दागिने हिसकावत होता. दागिने मोडलेल्या पैशाचा वापर तो कर्ज फेडण्यासाठी करत असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे तो स्कुटीवरून एकटाच चोऱ्या करत असल्याचे तपासात समोर आले असल्याचे अशोक भापकर यांनी सांगितले.








