पथनाट्याद्वारे मांडली व्यथा, टॉर्चच्या साहाय्याने श्रद्धांजली
प्रतिनिधी/ बेळगाव
पश्चिम बंगाल येथे झालेल्या महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेसह प्राध्यापक संघटनेकडून चन्नम्मा चौकात आंदोलन करून घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांकडून पथनाट्या सादर करून घटनेची माहिती दिली. तर जवळपास तासभर चन्नम्मा चौकात राऊंड करून आंदोलन करण्यात आले.
कोलकत्ता येथील घटनेमुळे संपूर्ण देशाला हादरा बसला आहे. आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयातील या घटनेमुळे डॉक्टर सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. एकीकडे महिला साक्षरतेसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे. मात्र त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतेच कठोर पाऊल उचलले जात नाहीत. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. सरकारने महिला सुरक्षेसाठी कडक भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सुरक्षा दिल्याशिवाय सेवा देणार नाही, अशी भूमिकाही घेण्यात आली. पीडित महिला डॉक्टरच्या कुटुंबियांना सरकारने तत्काळ सुरक्षा व्यवस्था देऊन न्याय द्यावा, अशा घटना पुन्हा घडू नयेत. यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान बीम्सच्या डॉक्टरांकडून पथनाट्या सादर करून मुलीच्या जन्मापासून तिच्या पालकांकडून तिच्या शिक्षणासाठी घेतलेले परिश्रम यादरम्यान डॉक्टर होण्यासाठी घेतलेले कष्ट, डॉक्टर झाल्यानंतर समाजसेवा करत असताना झालेला दुर्दैवी आघात याचे चित्रण पथनाट्याच्या माध्यमातून सादर करण्यात आले. यावेळी कोलकत्ता येथे हत्या करण्यात आलेल्या महिला डॉक्टरला श्रद्धांजली वाहण्यात आली. चन्नम्मा चौकात सर्कल करून मोबाईल टॉर्च दाखवून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. मृत डॉक्टरला मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. बीम्स आवारातील मोर्चाला प्रारंभ करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरून चन्नम्मा चौकात साखळी आंदोलन करण्यात आले.









