तीन कारसह दुचाकीचे नुकसान : महिला जखमी
बेळगाव : बेळगाव-खानापूर रोडवरील ब्रह्मनगर क्रॉसजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या साखळी अपघातात तीन कार व एका दुचाकीचे नुकसान झाले. या अपघातात दुचाकीवरील महिला जखमी झाली आहे. एका पाठोपाठ एक तीन कारची धडक बसून हा अपघात झाला. याचवेळी दुचाकीवरून जाणाऱ्या दिव्या सुजय पाटील (वय 23) रा. महावीरनगर या अपघातात जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. घटनेची माहिती समजताच वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. चार वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.









