दुर्गा मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात : दौड-दांडियाचीही जोरदार तयारी
बेळगाव : शारदीय नवरात्रोत्सवाला रविवार दि. 15 पासून सुरुवात होत आहे. यानिमित्त दुर्गा मूर्ती साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बेळगावमध्ये दुर्गा मूर्ती पूजन करणाऱ्या मंडळांची संख्या वाढत असल्यामुळे मूर्ती घडविण्याचे काम जोमात सुरू आहे. याबरोबरच दांडिया, रास-गरबासाठी पोशाख, दौडसाठी पांढरे कुर्ते खरेदीसाठी गर्दी होत आहे. गणेशोत्सव संपतो न् संपतो तोच नवरात्रोत्सवाची धांदल सुरू होते. मागील काही वर्षात बेळगाव शहर व उपनगरांमध्ये दुर्गा मूर्ती पूजन करण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी बेळगावस्थित बंगाली नागरिक सांबरा व हिंदवाडी येथे दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करीत होते. आता मात्र शहराच्या बऱ्याचशा भागात दुर्गा मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे. यामुळे मूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मूर्तींमध्ये वाढ झाली आहे. नवरात्रोत्सवात शिवप्रतिष्ठानतर्फे शहर तसेच तालुक्यामध्ये भव्य दुर्गामाता दौड काढली जाते. यामध्ये हजारोंच्या संख्येने तरुण सहभागी होत असतात. दौडचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यासाठी आधीपासूनच तयारी केली जाते. याबरोबरच सहभागी होणारे तरुण पांढरी टोपी, भगवे फेटे, पांढरे कुर्ते, गळ्यातील माळा खरेदी करताना दिसत आहेत. तसेच सजावटीसाठी आतापासूनच खरेदी केली जात आहे.
रास-गरबासाठी खरेदी जोमात
बेळगावमध्ये उत्तर भारतीय नागरिकांकडून रास-गरबाचे आयोजन केले जाते. तसेच काही ठिकाणी दांडिया स्पर्धाही आयोजित केल्या जातात. यामुळे घागरा-चोली, दांडिया यासह बाजारात आलेले विविध पोशाख खरेदीसाठी तरुणाईची गर्दी होत आहे. विशेषत: पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली या परिसरात दांडियासाठीचे पोशाख विक्रीसाठी ठेवण्यात आल्याने खरेदीसाठी झुंबड उडत आहे.
मर्यादित मूर्तींचीच ऑर्डर…
गणेशोत्सव संपला की नवरात्रोत्सवाच्या तयारीला सुरुवात होते. यावर्षी मूर्ती घडविण्यासाठी कमी कालावधी उपलब्ध झाल्याने मर्यादित मूर्तींचीच ऑर्डर घेण्यात आली. मागील वर्षीपेक्षा यावर्षी मूर्तींच्या संख्येत वाढ झाली आहे. येत्या दोन दिवसात मूर्तींचे काम पूर्ण केले जाणार आहे. दोन फुटापासून अकरा फुटांपर्यंत या मूर्ती घडविल्या जात आहेत. बेळगाव शहरासह तालुक्यामध्ये या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
-भरत कुंभार, मूर्तिकार









