ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भारत राष्ट्र समिती पक्षाचे (बीआरएस) अध्यक्ष आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातील आगामी लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी नुकतीच नांदेमध्ये सभा घेतली होती. त्यानंतर आता 14 एप्रिलला ते छ. संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. माजी आ. हर्षवर्धन जाधव यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
जाधव म्हणाले, येत्या 14 एप्रिलला बीआरएसची छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा होणार आहे. या सभेला के चंद्रशेखर राव उपस्थितीत राहणार आहेत. मागील 70 वर्षात शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेला काय मिळाले. आजही या घटकांची अवस्था बिकटच आहे. मात्र, तेलंगाणामध्ये मुख्यमंत्री केसीआर यांनी शेतकऱ्यांसाठी दरवर्षी एकरी 10 हजार रुपये अनुदान, 24 तास मोफत वीज पुरवठा आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले. शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांचे विमा कवच दिले, असे अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. असेच निर्णय भविष्यात महाराष्ट्रातही घेतले जातील.
केसीआर यांचे तेलंगणातील कार्य पाहून महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते बीआरएसमध्ये येण्यास उत्सुक आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील सभेनंतर त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.








