दोन पेपर सुरळीत : गैरप्रकार रोखण्यासाठी चित्रीकरण
प्रतिनिधी / बेळगाव
अभियांत्रिकी, कृषी, पशुवैद्यकीय, फार्मसी आदी व्यावसायिक कोर्सच्या प्रवेशासाठी गुरुवारपासून सीईटीला प्रारंभ झाला. जिल्हय़ातील 29 परीक्षा केंद्रांवर सीईटीला सुरुवात झाली. गुरुवारी सकाळच्या सत्रात जीवशास्त्र तर दुपारच्या सत्रात गणित विषयाचा पेपर झाला. कोरोना नियमांचे पालन करून पहिल्यादिवशी सीईटी सुरळीत पार पडली. परीक्षा कालावधीत गैरप्रकार रोखण्यासाठी व्यवस्थेचे पूर्णपणे चित्रीकरण केले जात
आहे.
इंजिनिअरिंग, आर्किटेक्टसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सीईटी महत्त्वाची आहे. या परीक्षेच्या गुणवत्तेवरच पुढील प्रवेश आधारित आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 15 तर चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ात 14 केंद्रांवर सीईटीला सुरुवात झाली.
उद्या कन्नड भाषेची परीक्षा
मागील दोन वर्षांत बारावीच्या वार्षिक परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी परीक्षा न देताच पास झाले होते. त्यामुळे सीईटीला सामोरे जाणाऱया विद्यार्थ्यांसमोर अडचणी आल्या होत्या. मात्र यंदा बारावीची परीक्षा सुरळीत पार पडली आहे. त्यामुळे सीईटीही सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा खात्याने ठेवली आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात भौतिकशास्त्र तर दुपारी रसायनशास्त्र विषयांचे पेपर होणार आहेत. शनिवारी कन्नड भाषेची परीक्षा होणार आहे.









