पुणे / प्रतिनिधी :
राज्य सामायिक प्रवेश चाचणी कक्षाकडून बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी आणि बीपी अन्ड ओ या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना 9 सप्टेंबरपासून पसंतीक्रम अर्ज भरता येणार आहेत. सेलने जाहीर केलेल्या तीन फेऱ्यांच्या वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया ऑक्टोबर अखेरपर्यंत चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सीईटी सेलकडून एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियाही राबविली जात असून सध्या दुसरी फेरी सुरू आहे. त्यानंतर आयुष अभ्यासक्रमांची प्रक्रिया सुरू होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर सेलकडून आयुष व इतर संबंधित अभ्यासक्रमांसाठीचे तीन फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
सेलकडून या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यापूर्वीच नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आता पहिल्या फेरीसाठी 8 सप्टेंबर रोजी अभ्यासक्रमनिहाय उपलब्ध जागांची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर 9 ते 12 सप्टेंबर या कालावधीत पसंतीक्रम भरता येतील. तर त्यानुसार 14 सप्टेंबर रोजी पहिल्या फेरीची निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 15 ते 20 सप्टेंबरदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागेल. विद्यार्थ्यांना 29 सप्टेंबर रोजी प्रवेश रद्द करता येतील.