सांगली :
ऐन शाळा प्रवेशाच्या तोंडावर ‘सर्व्हर’ डाऊनचा सुरू असलेला खेळ पालक आणि विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक झाला आहे. सांगली, मिरजेसह जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रवेशांना सर्व्हर डाऊनमुळे विलंब होत आहे. डोमेनसाईल, उत्पन्न, नॉनक्रिमीलेअर दाखले वेळेत मिळत नसल्याने सेतू सेवा केंद्रावरील गर्दी दोन महिन्यापासून हटायला तयार नाही. केवळ सर्व्हर डाऊन आहे. वर कळवले आहे, अशा शब्दांनी पालक आणि विद्यार्थ्यांची बोळवण करण्यात येत आहे. परंतु माहिती तंत्रज्ञान महामंडळाने जिल्ह्यासाठी पूर्णवळ जिल्हा समन्वयकाची नेमणूकच केली नसल्याने अडचणी कोणासमोर मांडायच्या असा प्रश्न सेतू चालकांसमोर पडला आहे.
एका बाजूला पालक आणि विद्यार्थ्यांच्या गर्दीला तोंड देता देता नाकी नऊ आलेल्या आपल्या तक्रारी कोणासमोर मांडायच्या या समस्येने सेतूचालकही त्रस्त आहेत. जिल्ह्यात केवळ अकरावी प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दहा हजारांवर आहे. याशिवाय वेगवेगळ्या इयत्ता तसेच उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना लागणाऱ्या दाखल्यांसाठी पालक विद्यार्थ्यांकडून नागरी सुविधा केंद्रामध्ये खेटे घालण्यास सुरूवात झाली आहे.
सांगली शहरासह जिल्हयातील ई सेवा, सेतू सुविधा केंद्रांच्या माध्यमातून विविध प्रकारचे दाखले उपलब्ध करण्यात येतात. दाखल्यांसाठी ऑनलाईन अर्ज करूनही अनेक पालकांसह विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. तर पालक विद्यार्थ्यांना सरकारी काम आणि सहा महिने थांब या उक्तीचा प्रत्यय येत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने हे दाखले मिळण्यास विलंब होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. सर्वच सेतू केंद्रामध्ये पालकांसह विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्याचे दिसत आहे.
- दिवसभरात दहाच दाखले
नागरी सेतू केंद्रात सकाळी साडेदहा ते साडेबारा या वेळेतच सर्व्हर सुरू रहातो. त्या वेळेत शक्य तितक्याच विद्यार्थ्यांना दाखले दिले जातात. त्यांनतर सायांकाळपर्यंत सर्व्हर डाऊनचा फटका यंत्रणेसह विद्यार्थांना बसत आहे. परिणामी दररोज सुमारे शंभर दाखले तयार होणे अपेक्षित असताना केवळ दहा ते पंधराच दाखले तयार होत आहेत. त्यामुळे पालकांना मुदत देऊनही त्या वेळेत दाखले देणे शक्य होत नाही. रात्री उशीरापर्यंत सर्व्हरवर काम करायचे म्हटले तरीही अधिक दाखले तयार करता येत नसल्याच्या तक्रारी आहेत.
- अर्ज स्विकृतीलाही विलंब
ऑनलाईन अर्जाची स्विकृती करताना एका दाखल्याची एन्ट्री घेण्यासाठी अर्धा ते एक तासापेक्षा अधिक वेळ लागतो. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अर्ज स्विकृती झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यासाठी अर्ज पाठवण्यास विलंब होतो. तसेच त्या संबंधीत कर्मचाऱ्याकडे दाखल दिसत नाही अनेक दाखले मंजूर करताना एरर दाखवत असल्याने त्या अर्जाची पुन्हा नव्याने एन्ट्री करावी लागत आहे. आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतरही ती दिसत नाहीत. त्यामुळे दाखल पुढील डेस्कला पाठवण्यास विलंब होतो. परिणामी दाखले वेळेवर मिळत नाहीत.
- एकच लॉग इन प्रणालीचा फटका
राज्य सरकारने महा ई सेवा केंद्रासाठी एक लॉग इन प्रणाली वापरात आणली आहे. तीच पध्दत सेतू केंद्रांना लागू केली आहे. महा ई सेवा केंद्रात कमी प्रमाणात विद्यार्थी पालक येतात. त्या तुलनेने सेतू केंद्रात दोनशेहून अधिक पालक दाखल्यांसाठी अर्ज करतात. महा ई सेवा केंद्रांचा लॉग इन प्रणालीचा नियम सेतू केंद्रांनाही लावण्यात आला आहे. त्यामुळे ई सेवा केंद्राप्रमाणे सेतू केंद्रात केवळ दहा ते पंधरा जणांनाच दाखले मिळत आहेत. सेतू केंद्रातील उर्वरितांना दाखले मिळत नाहीत. सेतू केंद्राला एकच लॉग इन सर्वत्र वापरण्याची मुभा दिल्यास अनेक सेतू केंद्रामध्ये दाखले मिळणे सुलभ होईल. सेतूमध्ये येणाऱ्या बहुतांशी नागरिकांना दाखले देणे अथवा त्यांच्या अर्जावर विचार करून प्रक्रिया करावी लागते. सेतू सेवा केंद्रात एक लॉग इन वरून दाखला वितरीत करावा लागतो. अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसांनी दाखल घेण्यास आलेल्या व्यक्तींना दाखला द्यायचा असेल तर संबंधीत व्यक्तीला लॉग आऊट करून नव्याने लॉग इन करावे लागते. मात्र परत लॉग इन करताना तांत्रिक अडचणी येत आहेत.
- जिल्हा समन्वयकच नाही
सर्व्हर डाऊनची अडचण ही नेहमीचीच झाली आहे. त्यामुळे तात्काळ तोडगा काढण्याची गरज असते. परंतु माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून जिल्ल्यात पूर्णवळ समन्वयकच नेमण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या अडचणी सोडवणार कोण असा पश्न निर्माण झाला आहे.
- एकाच अर्जासाठी अनेकदा एन्ट्री
ज्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांनी दाखले मंजूर करून त्या दाखल्यावर स्वाक्षरी केली जाते. मात्र स्वाक्षरीच्या खाली प्रांताधिकारी असे पद न येता तहसिलदार असे पद येते. त्यामुळे एकाच दाखल्यासाठी पुन्हा पुन्हा एन्ट्री करावी लागत असून त्याचा फटका ऑपरेटसह कर्मचाऱ्यांना बसत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने दुपारनंतर दाखल्यांसाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.








