पंतप्रधान मोदींसह सर्व संसदसदस्यांची उपस्थिती
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षा’च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारात संसदेच्या भोजनगृहात ‘तृणधान्य भोजना’चा कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. या भोजन कार्यक्रमाला संसदेचे बहुतेक सदस्य उपस्थित होते. या भोजनात, ज्वारी, बाजरी आणि नाचणी इत्यादी तृणधान्यांपासून बनविलेल्या स्वादिष्ट पदार्थांचा समावेश होता, अशी माहिती देण्यात आली.
नाचणीपासून बनविण्यात आलेल्या भाकरी, इडल्या आणि दोसे यांच्या या भोजनात विशेषत्वाने समावेश होता. हे पदार्थ बनविण्यासाठी कर्नाटकातून एका विशेष आचाऱयांना निमंत्रित करण्यात आले होते. याशिवाय 22 हून अधिक स्वयंपाकीही बोलाविण्यात आले होते. या भोजनातील सर्व पदार्थ संसदेच्या भोजनगृहातच तयार करण्यात आले होते. मोठय़ा तृणधान्यांचा आहारात समावेश करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून हा कार्यक्रम होता.
पुढील वर्ष तृणधान्य म्हणून घोषित
पुढील वर्ष, अर्थात वर्ष 2023 हे ‘आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. 2021 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात भारताने हा प्रस्ताव ठेवला होता. तो संमत करण्यात आला. त्यामुळे पुढचे वर्ष जगभरातच तृणधान्य वर्ष म्हणून साजरे होणार आहे. भारताने मांडलेल्या प्रस्तावाचे समर्थन 70 हून अधिक देशांनी केले होते. त्यामुळे तो सहजगत्या संमत झाला होता.
कृषी विभागाकडून आयोजन
या कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. या भोजनाच्या प्रारंभी सूप देण्यात आले. ते बाजरीच्या पेजेपासून बनविण्यात आले होते. याशिवाय प्रारंभीचे अन्नपदार्थ म्हणून तृणधान्यांपासूनच बनविलेले काही पदार्थ वाढण्यात आले होते. मुख्य भोजनात, रोटी, भाकरी, विविध प्रकारच्या भाज्या, चटण्या, कोशिंबिरींसह तृणधान्यांपासून बनविलेले इतर पदार्थ होते. डोसे आणि इडल्यांचा समावेश आवर्जून करण्यात आला होता.
महनीयांची उपस्थिती
या भोजन कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व अतिथींनी या रुचकर भोजनाची प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समयसूचकतेचे आणि कल्पकतेचेही यावेळी अनेक सदस्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचा उद्देश महत्वाचा
सध्या साऱया जगाला पर्यावरणाच्या समस्येशी दोन हात करावे लागत आहेत. वातावरणाचा समतोल बिघडल्याने पाऊस अनियमित झाला आहे. याचा परिणाम पारंपरिक धान्यांच्या उत्पादनावर होत आहे. पारंपरिक धान्यांमध्ये प्रामुख्याने गहू आणि तांदूळ यांचा समावेश होतो. त्यांचे उत्पादन कमी झाल्यास मानवावर अर्धपोटी राहण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे या पारंपरिक धान्यांना पर्याय म्हणून बाजरी, ज्वारी, नाचणी, ओट, राय यांसारख्या तुलनेने कमी उपयोग केल्या जाणाऱया तृणधान्यांचा उपयोग करण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे. यासाठी या धान्यांचे महत्व आणि भूक भागविण्याची त्यांची क्षमता यांसदर्भात लोकांचे प्रबोधन होणे आणि या धान्यांना उचित लोकप्रियात मिळणे आवश्यक आहे. या प्रमुख उद्देशांसाठी संसदेत तृणधान्य भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अलिकडच्या काळात या धान्यांचे उत्पादन अधिक घेण्यासाठी आणि त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जगभरात प्रयत्न होत आहेत.









