1997 साली बांधण्यात आलेल्या शाळेची दुरावस्था
विशाल कदम/ सातारा
शिक्षण हा मुलभूत हक्क आहे. सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी साताऱयातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संस्था सुरु केली. त्याच साताऱयातल्या गोळीबार मैदान येथील झेडपीच्या शाळेची दयनिय अवस्था झालेली आहे. एका बाजूला मध्यंतरी शाळा आयएसओ करण्याची चढाओढ सुरु होती. तर दुसऱया बाजूला शाळेला लागलेली साडेसाती काही सुटता सुटेना. त्याच शाळेत दाटीवाटीने पार्टीशन करुन विद्यार्थी अ, ब, क, चे धडे घेत आहेत. एकदा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी शाळेला भेट द्यावी, असा सुर पालकवर्गातून उमटू लागला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेतात. त्या शाळा कसा आहेत हे ग्रामीण भागात जावून पहायला नको आहे. तर आपल्या सातारा शहरातच गोळीबार मैदान येथे असलेल्या शाळेला भेट दिली तरी परिस्थिती समजते. सहा वर्षापूर्वी सातारा पंचायत समितीच्या सभेत तात्कालिन सदस्या वनिता कण्हेरकर यांनी नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीवरुन विद्युत वाहक तार केल्याने धोकादायक बनली आहे. तरी त्या इमारतीत शाळा भरवू नये, असा ठराव मांडला होता. तेव्हापासून मैदानाच्या कोपऱयात असलेली शाळा बंद अवस्थेत आहे. तर 1997 साली बांधण्यात आलेल्या शाळेतच शाळा भरवण्यात येते. या शाळेचे छत खराब झाले आहे. भिंती गळक्या आहेत. वरच्या मजल्यावर जाण्याकरता जिन्हा आहे. जिन्यावरुन जाताना विद्यार्थ्यांनाही भिती वाटते. तळमजल्यात तीन वर्ग सुरु असून ते विद्यार्थी दाटीवाटीने बसतात. जेथे पोषण आहार शिजवला जात होता त्या खोलीत वर्ग भरवला जातो. तर पोषण आहार बाजूलाच असलेल्या भांडार खोलीत शिजवला जातो. शाळेला कंपाऊंड नाही. अशा भौतिक सुविधा नसतानाही शाळेचा पट इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत 180 पट आहे. मुख्याद्यापिका सीमा जाधव यांच्यासह पाच शिक्षक चांगले शिक्षण देत आहेत. मात्र, भौतिक सुविधा शाळेला नसल्याने पेच वाढला आहे.
नेमका पेच काय आहे…
जिल्हा परिषदेच्या गोळीबार मैदान शाळा हे सातारा शहरातील झेडपीची सर्वात जवळची शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेचा नेमका पेच काय तर ती शाळा पोलीस अधीक्षक यांच्या जागेत आहे. त्यामुळे शाळेसाठी नवीन इमारत बांधणे व इतर कामे करताना पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. त्यातच आता हा भाग सातारा पालिकेच्या हद्दीत आलेला आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी त्या शाळेला दोन दिवसांपूर्वी भेट दिली आणि शाळेची माहिती घेतली. दरम्यान, या शाळेसाठी सामाजिक कार्यकर्ते संग्राम बर्गे व माजी नगरसेवक शेखर मोरे पाटील यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी शाळेला भेट द्यावी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी अचानकपणे शाळेला व्हिजीट करावी. विद्यार्थी कसे अडचणीमध्येच शिक्षण घेत आहेत. भौतिक सुविधा काय काय दिल्या जात ओहत. तरच शाळैच्या समस्या समजतील, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
माहिती घेवून सांगतो
जिल्हा परिषदेच्या गोळीबार शाळेचा प्रश्नाबाबत प्रभारी शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, मी माहिती घेवून सांगतो. परंतु पाठीमागे शाळेच्या सुधारणेच्या अनुषंगाने दोन वेळा बैठका झाल्या होत्या. आताही त्यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. सध्याचे नेमके स्टेटस् काय आहे त्याबाबत मी माहिती घेवून सांगतो.
धनंजय चोपडे प्रभारी शिक्षणाधिकारी








