७३ शिक्षक आणि मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस; अध्यापनाच्या पूर्व तयारीशिवाय मुलांना शिक्षणाचे धडे; अनेक शाळांत विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रकच नाही; शालेय स्वच्छतेचे तीन तेरा
कृष्णात चौगले कोल्हापूर
माध्यमिक शिक्षण विभागाकडून जून महिन्यापासून आठवड्यातून दोन दिवस जिह्यातील शाळांना भेटी दिल्या जात आहेत. या भेटीतून शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या भोंगळ कारभाराचा पोलखोल करून त्यांना ‘धडा’ शिकवला आहे. मुलांना परिपूर्ण शिक्षण देणे ही आपली जबाबदारी आहे, याची जाण आणि भान काही शिक्षक व मुख्याध्यापकांना नसल्याचे या भेटीमध्ये स्पष्ट झाले आहे. शाळेतील पहिला तास हा हजेरी घेऊन सुरु होतो. त्यामध्ये त्या दिवसातील हजर, गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या समजते. पण काही शाळांमध्ये हजेरी पत्रकच नसल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. त्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या 73 ‘कर्तव्यदक्ष’ मुख्याध्यापक आणि शिक्षकांना शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सीईओ कार्तिकेयन एस यांनी जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुखांना आठवड्यातून दोन दिवस क्षेत्र भेट देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार बुधवार आणि गुरुवारी या दोन दिवसांत सर्व विभाग प्रमुख जिह्याच्या विविध भागात क्षेत्र भेट देऊन आपल्या विभागातील कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेत आहेत. त्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या तीन पथकांनी गेल्या महिनाभरात 80 हून अधिक शाळांना भेटी दिल्या आहेत. यामध्ये गुरुजींना आपल्या कर्तव्याचा विसर पडला असल्याचे चित्र त्यांना अनेक शाळांमध्ये पहावयास मिळाले.
‘गुरुजी हे वागण बरं नव्हं’
मुख्याध्यापकांनी पुढील वर्षभरातील शालेय नियोजन करणे अपेक्षित असते. पण अनेक मुख्याध्यापकांकडे त्याबाबतचे कोणतेही नियोजन अथवा आरखडा शाळा भेटी दरम्यान दिसून आला नाही. बहुतांशी शिक्षक वर्गावर जाताना आपण विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहोत ? याची पूर्वतयारी न करताच वर्गात जात असल्याचे निष्पन्न झाले. ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्याबाबत कोणतेही नियोजन दिसून आले नाही. शाळेचा पहिला तास वर्गशिक्षकांनी हजेरी घेवून सुरु होणे अपेक्षित आहे. पण हजेरी घेणे दूरच शाळेमध्ये हजेरीपत्रकच उपलब्ध नसल्याची गंभीर बाब भेटीमध्ये समोर आली. काही शाळांमध्ये हजेरीपत्रक आहे, पण त्यामध्ये वर्गातील मुलांची नावेच नसल्याचे दिसून आले. शालेय स्वच्छता नाही. भेटीदरम्यान कार्यालयीन तपासणी करताना तेथे अनेक रेकॉर्ड नसल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे ‘गुरुजी हे वागण बरं नव्हं’ असे म्हणण्याची वेळ शाळा भेटीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर आली.
सहा तालुक्यातील शाळांना दिली भेट
माध्यमिक शिक्षण विभागातील 3 पथकांनी सहा तालुक्यातील 80 हून अधिक शाळांना भेटी दिल्या. यामध्ये तब्बल 73 शाळांतील अनागोंदी कारभार उघडकीस आला. त्यामुळे शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी गगनबावडा तालुक्यातील 2 मुख्याध्यापक, शिरोळमधील 1 मुख्याध्यापक, भुदरगडमधील 3 मुख्याध्यापक, हातकणंगलेमधील 36 मुख्याध्यापक आणि शिक्षक, करवीरमधील 23 मुख्याध्यापक आणि शिक्षक, राधानगरीतील 8 मुख्याध्यापक आणि शिक्षकांना प्रशासकीय कारवाई का करू नये ? अशी कारणे दाखवा नोटीस बजावली असून कामांत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तर त्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे पगार रोखणार
गेल्या महिनाभरातील शाळा भेटीदरम्यान ज्या शाळांतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना नोटीस दिली आहे, पुन्हा त्याच शाळांना ऑगस्ट महिन्यात भेट देऊन संबंधित शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या कामात सुधारणा झाली आहे की नाही ? याची पडताळणी केली जाणार आहे. त्यावेळीही कामांत सुधारणा झाली नसल्याचे आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करून संबंधित शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा पगार रोखला जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी सांगितले.
तर त्या शाळेची मान्यता रद्द
अनेक शाळांतील विद्यार्थी शाळेच्या वेळेत अन्य अॅकॅडमीमध्ये जात असल्याचे निदर्शनास आले आहे. शासनाचा पगार घेणारे शिक्षकच त्या अॅकॅडमीमध्ये शिकवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी मस्टरवरील त्या शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर येऊ शकते. तसेच अशा शाळेची मान्यता रद्द करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे. शाळा भेटीची मोहिम यापुढे अधिक गतीमान करणार असून शिक्षक आणि मुख्याध्यापकांना त्यांच्या कर्तव्याची जाणिव करून देणार आहे. काही शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे काम चांगले असले तरी या भेटीतून कामचुकारांना ‘धडा’ शिकवला जाणार आहे.
एकनाथ आंबोकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जि.प.कोल्हापूर