अटकेनंतर झाले धक्कादायक खुलासे : हैदराबादमध्ये झाली कारर्वई
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणाच्या हैदराबाद येथील एका महिला डॉक्टरचे धक्कादायक कृत्य समोर आले आहे. येथील एका रुग्णालयाच्या सीईओ डॉ. नम्रता चिगुरुपति यांना कोके खरेदी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सीईओ नम्रता मुंबईतील एका सप्लायरकडून 5 लाखाचे कोकेन खरेदी करत असताना ही कारवाई झाली आहे. कारवाईवेळी त्यांच्याकडून आणि डिलिव्हरीमॅनकडून सुमारे 53 ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले आहे.
रायदुर्गम पोलिसांच्या एका टीमने विश्वसनीय माहितीच्या आधारावर डॉक्टर आणि सप्लायरला रंगेहात पकडले आहे. सप्लायर एका रेस्टॉरंटनजीक कोकेनचे पाकीट डॉक्टरला देत होता. डॉ. नम्रताने वंश धाकड नावाच्या सप्लायरला व्हॉट्सअॅपवर ड्रग्जची ऑर्डर दिली होती आणि यासाठी 4 मे रोजी 5 लाख रुपये दिले होते. धाकडचा सहकारी बालकृष्ण ड्रग्जची डिलिव्हरी करत असताना पोलिसांनी त्याला आणि डॉक्टरला पकडले आहे.
दोन्ही आरोपींकडून 53 ग्रॅम कोकेनसह 10 हजार रुपये रोख तसेच दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. नम्रता आणि बालकृष्ण विरोधात संबंधित कलमांच्या अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. तर मागील काही दिवसांमध्ये ड्रग्जकरता सुमारे 70 लाख रुपये खर्च केल्याचे डॉक्टर नम्रताने चौकशीदरम्यान मान्य केले आहे.









