वृत्तसंस्था/ हुबळी
2024 च्या रणजी स्पर्धेतील क इलाईट गटातील येथे सुरू असलेल्या सामन्यात रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर विशाख विजयकुमार आणि शरथ श्रीनिवास यांच्या शानदार नाबाद शतकांच्या जोरावर चंदीगड विरुद्ध कर्नाटकाची स्थिती अधिक मजबूत झाली आहे.
यष्टीरक्षक आणि फलंदाज श्रीनिवासने 160 चेंडूत 11 चौकारांसह नाबाद 100 तर विशाखने 141 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 103 धावा झळकाविल्या. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 198 धावांची भागिदारी केली. कर्नाटकाने आपला पहिला डाव 5 बाद 563 धावांवर घोषित केला. कर्नाटकातर्फे मनिष पांडेने शतक नोंदविताना 148 धावा जमविल्या होत्या. तत्पूर्वी चंदीगडचा पहिला डाव 267 धावांवर समाप्त झाला होता. चंदीगडने दुसऱ्या डावात 11 षटकार बिनबाद 61 धावा जमविल्या आहेत. कर्नाटकाने क गटात गुणवारीत 27 गुण मिळवित दुसरे स्थान घेतले आहे. या गटात गुजरात 25 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. कर्नाटकाने या स्पर्धेची यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
संक्षिप्त धावफलक : चंदीगड प. डाव 267, कर्नाटक प. डाव 5 बाद 563 डाव घोषित (मनिष पांडे 148, श्रीनिवास नाबाद 100, विशाख विजयकुमार नाबाद 103, हार्दिक राज 82, कालिया 3-143), चंदीगड दु. डाव बिनबाद 61.
सालेम येथे सुरू असलेल्या रणजी स्पर्धेतील अन्य एका सामन्यात तामिळनाडूने पंजाबवर पहिल्या डावात महत्त्वाची आघाडी मिळविली आहे. तामिळनाडूने या गटातून 22 गुण मिळविले आहेत. या गटात तामिळनाडूने पंजाब बरोबरचा सामना अनिर्णीत राखल्यास त्यांचे 25 गुण होतील. गुजरातनेही 25 गुण मिळविले आहेत. जर हा सामना तामिळनाडूने निर्णायक रितीने जिंकला तर त्यांचे 28 गुण होतील.
संक्षिप्त धावफलक – तामिळनाडू प. डाव 435, पंजाब प. डाव 274, पंजाब दु. डाव 4 बाद 180.









