वृत्तसंस्था/ इंदोर
2023 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे बुधवारपासून सुरू झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सुदीपकुमार घरमी आणि अनुत्सुप मुजुमदार यांच्या शानदार शतकांच्या जोरावर बंगालने मध्यप्रदेशविरुद्ध पहिल्या डावात 87 षटकात 4 बाद 307 धावा जमवल्या. घरमीने 112 तर मुजुमदारने 120 धावा झळकवताना तिसऱया गडय़ासाठी 241 धावांची द्विशतकी भागीदारी केली.
या सामन्यात बंगालने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीचा करण लाल आणि अभिमन्यू ईश्वरन हे दोन फलंदाज 51 धावात तंबूत परतले. अगरवालने करण लालचा त्रिफळा उडवला. त्याने 45 चेंडूत 2 चौकारासह 23 धावा जमवल्या. त्यानंतर गौरव यादवने ईश्वरनला त्रिफळाचित केले. त्याने 33 चेंडूत 5 चौकारासह 27 धावा जमवल्या. घरमी आणि मुजुमदार यांनी बंगालला भक्कम स्थितीत नेले. अगरवालने घरमीला पायचित केले. त्याने 213 चेंडूत 2 षटकार आणि 12 चौकारासह 112 धावा झळकवल्या. आवेश खानने मुजुमदारचा त्रिफळा उडवला. त्याने 206 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारासह 120 धावा जमवल्या. दिवसअखेर कर्णधार मनोज तिवारी 5 तर शहबाज अहमद 6 धावा खेळत आहे. मध्यप्रदेशतर्फे अगरवालने 2 तर यादव आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. हा उपांत्य सामना 5 दिवसांचा खेळवला जात आहे.
संक्षिप्त धावफलक
बंगाल प. डावा 87 षटकात 4 बाद 307 (घरमी 112, मुजुमदार 120, ईश्वरन 27, करण लाल 23, अगरवाल 2-21, यादव 1-37, आवेश खान 1-79).