वृत्तसंस्था/ .हुबळी
2024 च्या रणजी क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या क इलाईट गटातील सामन्यात शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर यजमान कर्नाटकाने पंजाब विरुद्ध पहिल्या डावात 6 बाद 461 धावा जमविल्या. देवदत्त पडीकल आणि मनिष पांडे यांनी शानदार शतके झळकाविताना चौथ्या गड्यासाठी 234 धावांची भागिदारी केली. पडीकलने 193 तर पांडेने 118 धावा जमविल्या.
या सामन्यात पंजाबचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यानंतर कर्नाटकाने 3 बाद 142 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांनी दिवसभरात आणखी 3 गडी गमाविताना 319 धावांची भर घातली. देवदत्त पडीकलने 216 चेंडूत 4 षटकार आणि 24 चौकारांसह 193 तर मनिष पांडेने 165 चेंडूत 3 षटकार आणि 13 चौकारांसह 118 धावा झळकाविल्या. एस. शरथ 5 चौकारांसह 55 तर विशाख 3 चौकारांसह 15 धावांवर खेळत आहेत. पंजाबतर्फे अर्शदीपसिंग, पी. दत्ता आणि नमन धीर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. कर्नाटकाने पंजाबवर 309 धावांची भक्कम आघाडी मिळविली आहे. कर्नाटकाचा संघ निर्णायक विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
संक्षिप्त धावफलक : पंजाब प. डाव सर्व बाद 152, कर्नाटक प. डाव 6 बाद 461 (देवदत्त पडीकल 193, मनिष पांडे 118, एस. शरथ खेळत आहे 55, हेगडे 27, विशाख खेळत आहे 15, अर्शदीप सिंग, पी. दत्ता आणि नमन धीर प्रत्येकी 2 बळी).









