काँग्रेसवर केला गंभीर आरोप
वृत्तसंस्था/ लखनौ
जनगणना आणि जातीय गणनेवरून बहुजन समाज पक्ष सतर्कता बाळगणार आहे. पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी यावरून अप्रत्यक्षपणे संशय व्यक्त करत केंद्र सरकारला जनगणना प्रामाणिकपणे करविण्याची ताकीद दिली आहे. मायावती यासंबंधी स्वत:च्या पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना सतर्क राहण्यास सांगणार आहेत. तसेच त्यांनी काँग्रेसवर जनगणना लटकविण्याचा आरोप केला आहे.
देशात राष्ट्रीय आणि जातीय जनगणनेचे कार्य काँग्रेसच्या काळापासून लटकले होते. याप्रकरणी जोरदार आवाज उठल्यावर आता प्रक्रिया सुरू झाली आहे. जनकल्याणाशी थेट स्वरुपात संबंधित जनगणनेचे कार्य देशहिताकरता आता प्रामाणिकपणे व्हायला हवे. या प्रकरणी पक्ष लोकांना योग्य माहितीची जाणीव करून देण्याचे काम करणार असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे.
निवडणूक तयारी सुरू
मायावती यांनी स्वत:च्या पोस्टद्वारे पक्षाच्या निवडणूक तयारीचीही माहिती दिली आहे. संघटनेसंबंधीच्या कार्याची समीक्षा केली जात आहे. उत्तरप्रदेशसह अन्य राज्यांमध्येही बैठकांद्वारे विचारविनिमय केला जात आहे. पूर्वांचलमध्ये पक्ष संघटनाची तयारी आणि जनाधार वाढविण्यावरून झालेल्या बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत. तर बिहार विधानसभा निवडणुकीकरता देखील रणनीतिवर काम सुरू असल्याचे मायावती यांनी सांगितले आहे.









