शेवटच्या दिवशी शहरासह तुरमुरी कचरा डेपोला भेट देऊन केली पाहणी
बेळगाव : गेल्या चार दिवसांपासून केंद्रीय स्वच्छ सर्वेक्षण पथकाकडून बेळगावात सुरू असलेले सर्वेक्षण मंगळवारी चौथ्या दिवशी पूर्ण झाले. शेवटच्या दिवशी महांतेशनगर, श्रीनगर, एस.पी.एम. रोड, कपिलेश्वर कॉलनी, बसवेश्वर सर्कल, शहापूर परिसरात सर्वेक्षण करण्यासह सायंकाळी तुरमुरी येथील घनकचरा प्रकल्पाला भेट देऊन पाहणी करण्यात आली. दरवर्षी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशातील विविध शहरांचे स्वच्छ सर्वेक्षण केले जाते. यासाठी केंद्रीय पथकाची नियुक्ती केली जाते. हे पथक आठ दिवसांपूर्वीच बेळगावला येणार होते. त्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील पर्यावरण अधिकाऱ्यांना पथकाची वाट पाहावी लागली होती. शिमोगा येथील स्वच्छ सर्वेक्षण उरकल्यानंतर शनिवारी तीन जणांचे स्वच्छ सर्वेक्षण पथक बेळगावात दाखल झाले.
या पथकात दोन पुरुष व एका महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरातील दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध भागांना भेटी देऊन पाहणी करण्यात आली. विशेषकरून उद्याने, तलाव, रस्ते, घंटागाडी आदींची माहिती घेण्यासह कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत घरोघरी भेटी देऊन नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. मंगळवारी सर्वेक्षणाच्या शेवटच्या दिवशी विविध ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी तुरमुरी येथील घनकचरा प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. त्याठिकाणी कशा पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, याची माहिती घेण्यात आली. कचरा वर्गीकरणासाठी अलीकडेच मशीन खरेदी करण्यात आली असून त्या मशीनची पाहणी करण्यात आली.









