प्रतिनिधी, खेड
Ratnagiri News : गणेशोत्सवात कोकण मार्गावर धावणाऱ्या आरक्षणात काळाबाजार झाल्याच्या आलेल्या तक्रारीनंतर मध्य रेल्वेने तिकीट आरक्षणाची सखोल तपासणी केली.या तपासणीत संशयास्पद युजर आयडी व पीएनआर मधून आरक्षित झालेली ७५० तिकिटे रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने आहे ही तिकिटे रद्द केलेल्या प्रवाशांना परतावाही मिळणार नसल्याचे रेल्वे स्पष्ट केले आहे.
कोकण मार्गावर गणेशोत्सवात धावणाऱ्या गाड्यांचे आरक्षण खुले झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच आरक्षण फुल्ल होवून खिडक्यांवर रांगेत उभ्या राहणाऱ्या चाकरमान्यांच्या पदरी निराशाच पडली होती.४ मिनिटातच १५ ते २१ सप्टेंबर कालावधीसाठी ३५४०६ जागांच्या उपलब्ध क्षमतेच्या तुलनेत तब्बल ५४४०१ बुकींग करण्यात आल्या.यात ५८७५ प्रवाशांनी काऊंटरद्वारे तर ४८५२६ प्रवाशांनी ऑनलाईन बुकींग केले होते. यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना निश्चित आरक्षण मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.या आरक्षणात झालेल्या सावळ्या गोंधळासह दलालांद्वारे तिकिटे बुक झाल्याने गणेशोत्सवातील कोकणातील रेल्वेगाड्यांच्या आरक्षणात काळाबाजार झाल्याच्या तक्रारी केंद्रीय रेल्वेमंत्री व राज्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत गणेशोत्सवातील आरक्षित तिकिटांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार मध्य रेल्वेने तिकीट आरक्षणाची तपासणी केली. यादरम्यान दर सेकंदाला २६६ तिकिटे याप्रमाणे आरक्षण सुरू होताच पहिल्या ४ मिनिटातच ५४ हजाराहून अधिक तिकिटांचे आरक्षण झाल्याचे समोर आले याशिवाय काही युजर आयडी व पीएनआर संशयास्पद आढळले होते. संशयास्पद आढळलेले पीएनआर बिहार व उत्तर भारतातील रेल्वेस्थानक परिसरातील असल्याचे उघड झाले होते.
अपूर्ण माहिती असलेल्या युजर आयडी वरून संशयास्पद आरक्षण झाल्याचे तपासात निष्पन्न झाले रेल्वे तिकीट आरक्षणात संशयास्पद आढळलेले १६४ युजर आयडी व १८९ पीएनआर रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. एका पीएनआर मधून कमाल ६ तिकिटे आरक्षित करता येतात. मात्र गणेशोत्सव कालावधीतील संशयास्पद तिकिटात प्रत्येक पीएनआर मागे सरासरी ३ ते ४ तिकिटेच आरक्षित केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार ५५० ते ७५० प्रवाशांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत. ही तिकिटे रद्द केलेल्या प्रवाशांना परतावाही मिळणार नसल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी स्पष्ट केले आहे.









