कर्नाटकचे काँग्रेस प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला यांची भाजपवर सडकून टीका
बेळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. परंतु, अशा महान व्यक्तीबाबत भाजपच्या नेत्यांना कोणतीही आस्था दिसून येत नाही. भाजपच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सोडले नाही तर ते मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधींवर टीका करणे सोडतील का? असा प्रश्न उपस्थित करत कर्नाटकचे काँग्रेस प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला यांनी भाजपवर सडकून टीका केली. सोमवारी बेळगाव विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली. काँग्रेस अधिवेशनाच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी ते बेळगावमध्ये आले होते. ते म्हणाले, सविनय कायदेभंग आंदोलनाची सुरुवातदेखील महात्मा गांधीजींनी बेळगावमधूनच केली. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला
होता. यानिमित्ताने गुरुवार दि. 26 डिसेंबर रोजी काँग्रेसची महत्त्वाची बैठक ज्या ठिकाणी महात्मा गांधीजींनी अधिवेशन घेतले, त्याच ठिकाणी होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. तर शुक्रवार दि. 27 रोजी सुवर्णसौध परिसरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्यानंतर मोठी जनसभा होणार असून यावेळी देशभरातील नागरिक सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांवर भाष्य करणाऱ्यांवर कारवाई करा
सी. टी. रवी यांनी मंत्री हेब्बाळकर यांच्याबद्दल उच्चारलेल्या अपशब्दांबाबत पत्रकारांनी सूरजेवाला यांना प्रश्न उपस्थित केला असता ते म्हणाले, भाजपने देशातील महिलाच नाही तर शेतकरी, दलित, युवक यांचाही वेळोवेळी अवमान केला आहे. त्यामुळे महिलांचा अवमान करणाऱ्यांवर राज्य सरकारने कडक कारवाई करण्याची सूचना त्यांनी केली. यानंतर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही कार्यक्रमाविषयी माहिती दिली.
सीपीएड मैदानाची पाहणी
बेळगावच्या सीपीएड मैदानावर काँग्रेस अधिवेशनाचा महत्त्वाचा सोहळा होणार आहे. यावेळी देशभरातील काँग्रेसचे खासदार, मुख्यमंत्री, तसेच अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी पूर्वतयारीची पाहणी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू सेठ, आमदार गणेश हुक्केरी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.









