तयार वस्तू विकण्यासाठी विमानतळावर स्टॉलची सोय
बेळगाव : महिला बचत गटांना आपली उत्पादने विक्री करता यावीत, यासाठी केंद्र सरकारच्या ‘अवसर’ योजनेतून बेळगाव विमानतळावर एक स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला आहे. बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयाकडे नोंद असलेल्या स्व-साहाय्य गटांना पंधरा दिवस आपली उत्पादने विक्री करण्याची संधी दिली जात आहे. यामुळे बेळगावमधील अनेक बचत गटांना आपली उत्पादने विक्री करण्यास हे उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
18 एप्रिल 2022 ला बेळगाव विमानतळावर ‘अवसर’ हा स्टॉल सुरू करण्यात आला. हस्तकौशल्यातून तयार केलेल्या वस्तू या ठिकाणी विक्री करण्याची मुभा देण्यात आली. सुरुवातीला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, विमानतळावर चांगल्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याने स्टॉलला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. महिलांनी तयार केलेल्या वस्तू व साहित्य स्थानिक बाजारपेठेत विक्री करताना अनेक समस्या येत होत्या. त्यांना मोठे व्यासपीठ देण्यासाठी जि. पं.च्या सहकार्याने ‘अवसर’ योजना लागू करण्यात आली.
बेळगाव जिल्ह्यात अनेक स्व-साहाय्य संघ असून ते विविध साहित्य तयार करीत असतात. जिल्हा पंचायत कार्यालयाकडे नोंदणी करण्यात आलेल्या स्व-साहाय्य संघांना व्यवसाय करण्याची संधी दिली जाते. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात नवीन स्टॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते झाले. अल्पावधीतच या स्टॉलला उत्तम प्रतिसाद मिळाला. हातमागाद्वारे तयार केलेल्या वस्तू, वनौषधी, मातीची भांडी यासह इतर साहित्य विक्रीसाठी या ठिकाणी ठेवले जात आहे.
बचत गटांचा चांगला व्यवसाय
विमानतळावरून अनेक लांब पल्ल्याचे प्रवासी प्रवास करत असतात.बेळगावची एक आठवण म्हणून ते एखादे साहित्य खरेदी करतात. ‘अवसर’ स्टॉलमुळे बचत गटांचा चांगला व्यवसाय होत आहे. प्रत्येक पंधरा दिवसानंतर नवीन बचत गटाला संधी दिली जाते.
– त्यागराजन, संचालक, सांबरा विमानतळ









