महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी घेतली केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांची भेट : फडणवीसांनी जपानमधून बजावली भूमिका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशांतर्गत महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. या मुद्द्यावर सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. 40 टक्के निर्यात शुल्क मागे घेण्याच्या मागणीवरून शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. चालू वर्षातील कांद्याच्या निर्यातीत महाराष्ट्राची हिस्सेदारी 50 टक्क्यांपेक्षा अधिक राहिली आहे. याचमुळे केंद्र सरकारने आता 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
निर्यात शुल्काच्या निर्णयाचा महाराष्ट्रातील राजकारणावर मोठा प्रभाव पडणार असल्याचे ओळखून केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सकाळी थेट दिल्लीत धाव घेत केंद्रीय वाणिज्य आणि ग्राहक संरक्षणमंत्री पियूष गोयल यांची भेट घेत राज्य सरकारचे म्हणणे मांडले होते. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क संपविण्याविषयी चर्चा केल्याचे मानले जात आहे. या बैठकीत कांद्याच्या निर्यातीचा प्रश्न मार्गी लागेल अशी शक्यता व्यक्त होत असतानाच जपानच्या दौऱ्यावर असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र तसेच राज्य सरकारने हा मुद्दा सोडविला असल्याचा दावा केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांच्याशी जपानमधून फोनवरून संपर्क साधला. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी नाशिक आणि अहमदनगरमध्ये विशेष खरेदी केंद्रे सुरू केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तेथे कांद्याची खरेदी 2,410 रुपये प्रति क्विंटल दराने केली जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.









