ऑनलाईन टीम/तरुण भारत
टाटा एअरबस नंतर सॅफ्रन प्रकल्पही हैद्राबादला गेला. राज्यातून एका मागून एक प्रकल्प जात असल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. असे असतानाच आता केंद्र सरकारने पुण्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक हब (Electronic Hub in Maharashtra) म्हणून घोषित करणार आहे. सर्वाधिक गुंतवणूक आणि सर्वाधिक रोजगार इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे. हा प्रकल्प म्हणजे राज्यासाठी केंद्र सरकारने दिलेलं गिफ्टच आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. तसेच आगामी वर्षात राज्यात टेक्स्टाईल क्लस्टर उभारण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.
येत्या अर्थसंकल्पापर्यंत राज्यात नवा प्रकल्प येणार आहे. हे होत असताना एकीकडे महाराष्ट्रात आमचं सरकार येऊन तीनच महिने झाले तरीही फेक नरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रातून उद्योग चाललेत. या फेक नरेटिव्हमध्ये काही राजकीय पक्ष, त्यांची इको सिस्टिम आणि दुर्दैवाने बोटावर मोजण्याइतके चार पाच एचएमवी पत्रकार. एचएमवी म्हणजे हिज मास्टर्ज व्हॉईस. असे मिळून या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातलाय, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी केला.
मी केंद्र सरकारचे आभार मानतो. आजच केंद्र सरकारने महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घोषणा केली आहे. आगामी काळात महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सर्वाधिक गुंतवणूक आणि रोजगार हा इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही एक भेटच आहे. नवीन वर्षामध्ये महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून टेक्सटाईल पार्कदेखील मिळणार आहे. यातून महाराष्ट्रात टेक्स्टाईल पार्क उभा राहण्यास मदत होणार आहे. याचं प्रपोजल अंतिम टप्प्यात आहे. मी त्याची माहिती घेतली आहे. नवीन वर्षात आर्थसंकल्प सादर होईपर्यंत त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे, तशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.