दहशतवादी संघटनांविरोधात कठोर पाऊल : पाकिस्तान समर्थक फुटीरतावादी गटाला दणका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय गृह मंत्रालयाने रविवारी जम्मू-काश्मीरमधील ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ (टीईएच) या आणखी एका संघटनेला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याने आणि भारतविरोधी प्रचार केल्यामुळे ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ या संघटनेला प्रतिबंधित म्हणून घोषित केले. ही संघटना जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळे करून इस्लामिक शासन स्थापन करण्याच्या कारवायांमध्ये सामील असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. सरकारने 4 दिवसात दुसऱ्या गटावर बंदी घातली आहे. यापूर्वी 27 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने मुस्लीम लीग जम्मू काश्मीर मसरत आलम गटाला बेकायदेशीर घोषित केले होते. गृहमंत्र्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही माहिती दिली होती.
‘तेहरिक-ए-हुर्रियत’ ही संघटना भारतविरोधी प्रचार करत आहे आणि जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादाला चालना देण्यासाठी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेली आहे. पंतप्रधान मोदींच्या दहशतवादाविरोधातील शून्य सहिष्णुतेच्या धोरणांतर्गत भारतविरोधी कारवायांमध्ये सामील असलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेवर तात्काळ बंदी घातली जाईल, असा इशाराही केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिला आहे. आपल्या देशाची एकता, सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या विरोधात काम करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. भारतविरोधी कारवाया करणाऱ्यांना कायद्याला सामोरे जावे लागेल, असा सरकारचा स्पष्ट संदेश असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
भारत सरकारने ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ संघटनेवरील बंदीसंबंधीची माहिती देणारी अधिसूचना जारी केली आहे. त्यात ही संघटना जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी विचारसरणीचा प्रसार करत असल्याचे सांगण्यात आले आहे. दहशतवाद्यांच्या मृत्यूनंतर संघटनेशी संबंधित लोकांनी त्यांना श्र्रद्धांजली वाहिली. ते दगडफेकीच्या घटनांनाही प्रोत्साहन देतात. या संघटनेचे लोक काश्मीरला भारतापासून वेगळे मानतात आणि देशातील कायदा व सुव्यवस्था पाळत नाहीत, असेही दिसून आले आहे.
2004 मध्ये संघटनेची स्थापना
सय्यद अली शाह गिलानी यांनी 2004 मध्ये जमात-ए-इस्लामी काश्मीर सोडल्यानंतर त्यांनी 7 ऑगस्ट 2004 रोजी ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ संघटनेची स्थापना केली. ही एक फुटीरतावादी संघटना असून त्याचा उद्देश जम्मू-काश्मीरच्या तथाकथित स्वातंत्र्यासाठी आंदोलन करणे हे आहे.
चार दिवसांपूर्वीच एका संघटनेवर बंदी
सरकारने 27 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने मुस्लीम लीग जम्मू काश्मीर मसरत आलम गटाला बेकायदेशीर घोषित केले होते. या संघटनेची स्थापना मसरत आलम भट्ट यांनी केली होती. 2019 पासून तो दिल्लीच्या तिहार तुऊंगात बंद आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) 50 वषीय मसरतविरोधात दहशतवादी फंडिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 2010 मध्ये काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर देशविरोधी निदर्शने केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्याविऊद्ध सार्वजनिक सुरक्षा कायद्यानुसार (पीएसए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आलमविरोधात 27 एफआयआर दाखल आहेत.









