मोदी सरकारने यापुर्वीच मंजूर केलाय आवश्यक निधी
काणकोण : बहुचर्चित आणि गेल्या कित्येक वर्षांपासून मागणी असलेल्या करमल घाट रस्ता दुरूस्ती आणि रूंदीकरणासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण विभाग, वन आणि हवामान विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या चौपदरी रूंदीकरणाचे काम आता लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. काणकोणचे आमदार तथा गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्या विशेष प्रयत्नांमधून या रस्त्याच्या रूंदीकरणाची अर्धी लढाई सध्या त्यानी जिंकलेली असून या रस्त्यासाठी जी जमीन आरक्षित करण्यात येणार आहे, त्यासाठीचा निधी केंद्र सरकारने यापूर्वीच मंजूर केलेला आहे. या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी काही वृक्षतोड करावी लागणार आहे. काहींच्या मते या ठिकाणी बोगदा काढावा, असे मत असले तरी बोगदा तयार करणे अशक्य असल्याचा अहवाल संबधित खात्याने दिला आहे. त्यामुळे काही प्रमाणात वृक्षतोड करावीच लागेल. मुळातच या ठिकाणी निलगिरी, आकाशिया या झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. साधारणपणे 25 ते 50 वर्षांनंतर ती झाडे कापून नवीन झाडांची लागवड करण्याची वन खात्याची योजना आहे. त्या धर्तीवर हे काम करण्यात येणार असून येणाऱ्या तीन ते चार वर्षात बाळळी ते गुळे या रस्त्याचे रूंदीकरण करण्याच्या कामाला चालना मिळणार असल्याचे दिसत आहे.









