वृत्तसंस्था/ पाँडिचेरी
2023 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या देवधर करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील सामन्यातील मध्य विभागाने उत्तर विभागाचा 8 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात मध्य विभागातर्फे शिवम चौधरी आणि यश दुबे यांनी शानदार अर्धशतके झळकवली.
राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात आलेल्या या सामन्यात मध्य विभागाने नाणेफेक जिंकून उत्तर विभागाला प्रथम फलंदाजी दिली. उत्तर विभागाचा डाव 49 षटकात 164 धावात आटोपला. त्यानंतर मध्य विभागाने 33 षटकात 2 बाद 165 धावा जमवत हा सामना एकतर्फी जिंकला.
उत्तर विभागाच्या डावामध्ये के. यांगफो यांने 35, आशिष थापाने 31, रेक्स सिंगने 27 तर केशांगबामने 24 धावा केल्या. मध्य विभागातर्फे आदित्य सरवटेने 19 धावात 3, सारांश जैन 39 धावात 2, यश कोठारीने 4 धावात 2, कर्ण शर्माने 34 धावात एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना मध्य विभागाच्या डावात शिवम चौधरी यश दुबे यांनी दुसऱ्या गड्यासाठी 153 धावांची भागीदारी केली. शिवम चौधरीने 90 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 85 तर यश दुबेने 91 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 72 धावा झोडपल्या. या स्पर्धेतील मध्य विभागाचा गेल्या चार सामन्यातील हा पहिला विजय आहे. या स्पर्धेमध्ये 6 संघांचा समावेश असून गुणतक्त्यात मध्य विभागाचा संघ आता चौथ्या स्थानावर आहे. उत्तर विभागाने आतापर्यंत दोन सामने गमावले असून एक सामना जिंकत पाचवे स्थान मिळवले आहे.
संक्षिप्त धावफलक : उत्तर विभाग 49 षटकात सर्वबाद 164 (के यांगफो 35, आशिष थापा 31, रेक्स सिंग 27, केशिंगबाम 24, आदित्य सरवटे 3-19, सारांश जैन 2-39, यश कोठारी 2-4, कर्ण शर्मा 1-34), मध्य विभाग 33 षटकात 2 बाद 165 (शिवम चौधरी 85, यश दुबे 72, आय. लेमतूर 1-39).