वृत्तसंस्था/ अलूर
2023 च्या क्रिकेट हंगामाला दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेने प्रारंभ झाला आहे. येथे बुधवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पूर्व विभागाने मध्य विभागाला पहिल्या डावात 182 धावावर रोखले. दिवसअखेर पूर्व विभागाने पहिल्या डावात 2 बाद 32 धावा जमवल्या होत्या. या सामन्यातील पहिला दिवस गोलंदाजांचा ठरला. त्यांनी दिवसभरात 12 गडी बाद केले.
या सामन्यात मध्य विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण पूर्व विभागाच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. 71.4 षटकात त्यांचा पहिला डाव 182 धावात आटोपला. मध्य विभागाच्या एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. रिंकू सिंगने 6 चौकारासह 38, एच. मंत्रीने 29, विवेक सिंगने 2 चौकारासह 21, उपेंद्र यादवने 3 चौकारासह 25, चंडेलाने 2 चौकारासह 13, शुभम शर्माने 1 चौकारासह 13, शिवम मावीने 2 चौकारासह नाबाद 16 आणि आवेश खानने 1 षटकारासह 10 धावा केल्या. उत्तर विभागाचा मणिशंकर मुरासिंगने 42 धावात 5 तर शाहबाज अहमदने 42 धावात 2, पोरेल आणि शाहबाज नदीम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
पूर्व विबागाच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. संघाचे खाते उघडण्यापूर्वी कर्णधार ईश्वरन आवेश खानच्या गालंदाजीवर डावातील दुसऱ्या षटकात पायचित झाला. त्यानंतर आवेश खानने शंतनू मिश्राला 6 धावावर पायचित केले. पूर्व विभागाने दिवसअखेर 12 षटकात 2 बाद 32 धावा जमवल्या. हा सामना चार दिवसांचा खेळवला जात आहे. पूर्व विभागाचा संघ अद्याप 150 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे आठ गडी खेळावयाचे आहेत. मध्य विभागातर्फे आवेश खानने 13 धावा 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : मध्य विबाग प डाव (71. 4 षटकात सर्व बाद 182 (रिंकू सिंग 38, एच. मंत्री 29, विवेक सिंग 21, उपेंद्र यादव 25, मुरा सिंग 5-42, शाहबाज अहमद 2-42, पोरेल आणि नदीम प्रत्येकी एक बळी), पूर्व विभाग प. डाव 12 षटकात 2 बाद 32 (मिश्रा 6, ईश्वरन 0, धरमी खेळत आहे 19, नदीम खेळत आहे 6, आवेश खान 2-13).









