राज्य सरकारची निराशा : केंद्रीय मंत्र्यांकडून प्रतिसाद नाहीच
प्रतिनिधी/ बेंगळूर
अन्नभाग्य योजनेंतर्गत बीपीएल रेशनकार्डधारकांना प्रतिव्यक्ती 10 किलो तांदूळ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडे अतिरिक्त तांदूळ पुरवठा करण्याची विनंती केलेल्या राज्य सरकारची निराशा झाली आहे. शुक्रवारी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री के. एम. मुनियप्पा यांनी केंद्रीय अन्न-नागरी पुरवठा खात्याचे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, गोयल यांनी तांदूळ देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य सरकार कोणते पाऊल उचलणार?, जुलैपासून 10 किलो तांदूळ वितरण होईल का?, याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केंद्र सरकारकडून अन्नभाग्य योजनेसाठी अतिरिक्त तांदूळ पुरवठा करावा, अशी विनंती केली होती. त्यापाठोपाठ मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन केंद्राच्या गोदामांमधून तांदूळ पुरवठा करावा, अशी विनंती केली. मात्र, पियुष गोयल यांनी राज्याच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना मुनियप्पा म्हणाले, भेटीप्रसंगी गोयल यांनी अतिरिक्त तांदूळ पुरवठा करणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यावर तुमच्याकडे दुप्पट तांदूळसाठा आहे. का देणार नाही, अशी विचारणा केली. तसेच केंद्राने निश्चित केलेला दर देण्याची आमची तयारी आहे, असेही स्पष्ट केले. परंतु, विविध कार्यक्रमांसाठी तांदूळ द्यावा लागतो, असे कारण सांगून राज्याची विनंती फेटाळली आहे, असे मुनियप्पा यांनी सांगितले.
दुसरा मार्ग शोधावा लागणार!
केंद्र सरकारने तांदूळ वितरणाच्या बाबतीत राजकारण केले आहे. पुरेसा साठा असून देखील तांदूळ पुरवठा करण्यास नकार देणे कितपत योग्य आहे? अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत ही बाब येते. मागील युपीए सरकारच्या कालावधीत हा कायदा केला होता. मात्र, केंद्र सरकारने धोरण बदलले आहे. आता तांदूळ देणार नसल्याचे सांगत आहेत, अशी टिकाही त्यांनी केली.
दुसऱ्या राज्यांकडे धाव घ्यावी लागणार
काँग्रेसने विधानसभा निवडणुकीवेळी अन्नभाग्य योजनेंतर्गत 10 किलो तांदूळ देण्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेस सत्तेवर येताच पाच गॅरंटी योजना जारी करण्याची घोषणा केली होती. जुलै महिन्यापासून अन्नभाग्य योजना जारी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. सध्या केंद्र सरकारकडून दारिद्र्यारेषेखालील कुटुंबांना वितरित करण्यासाठी राज्याला प्रतिव्यक्ती 5 किलो तांदूळ पुरवठा केला जात आहे. आता अन्नभाग्य योजनेतून अतिरिक्त 5 किलो तांदूळ देण्याकरिता राज्य सरकारने केंद्राकडून खरेदी करण्याचे प्रयत्न केले. मात्र, केंद्र सरकारने अतिरिक्त तांदूळ पुरवठ्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारला आवश्यक असणारा अडीच लाख टनापेक्षा अधिक तांदूळ मिळविण्यासाठी दुसऱ्या राज्यांकडे धाव घ्यावी लागणार आहे.









