गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्त्वात बैठक : सात राज्ये मिळून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करणार
वृत्तसंस्था/ रायपूर
देशातील काही राज्यांमध्ये फोफावलेल्या नक्षलवादामुळे भारतातील सरकार त्रस्त आहे. नक्षलवादी राज्यांना आतून पोकळ करण्याचे आणि तरुणांना देशाविरुद्ध भडकवण्याचे काम सुरू असतानाच या ‘लाल दहशती’वर नियंत्रण ठेवण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी रायपूरमध्ये आंतरराज्य समन्वयाची बैठक बोलावली होती. या बैठकीत नक्षलवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी रणनीती आखण्यात आली.
रायपूरमध्ये शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला छत्तीसगड व्यतिरिक्त ओडिशा, झारखंड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश होता. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव सहाय तसेच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री विजय शर्मा हेदेखील या बैठकीत उपस्थित होते. यासोबतच सात राज्यांचे मुख्य सचिव, पोलीस महानिरीक्षक आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली आंतरराज्य समन्वय बैठकीत नक्षलवादग्रस्त भागातील कारवाया रोखण्यासाठी रणनीती आखण्यात आली. यासोबतच एकत्रित मोहीम राबविण्याबाबतही चर्चा झाली. बैठकीत नक्षली दहशतवादाला कठोरपणे आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेली रणनीती शेअर करण्यात आली. अशा परिस्थितीत नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या लोकांना सहज पकडता यावे यासाठी राज्ये आपापसात समन्वयाने काम करण्यावर एकमत झाल्याचे समजते.
बैठकीचा मुख्य अजेंडा
नक्षलग्रस्त राज्यांतील नक्षलवाद्यांच्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणाऱ्या हालचालींवर पूर्णपणे नियंत्रण ठेवता येणे हा या बैठकीचा मुख्य अजेंडा होता. बैठकीदरम्यान, सहभागी सात राज्यांच्या प्रतिनिधींनी आपापल्या राज्यांमधील रणनीती समजावून देत माहितीची देवाणघेवाण केली. नक्षलवादाच्या संदर्भात राज्यांमधील यंत्रणा आपापसात जोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या माध्यमातून नक्षलवाद्यांचे मनसुबे उधळले जाणार आहेत.









