नवी योजना क्रियान्वित, नवे दिशानिर्देश लागू
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशभरात टॉमेटोचे दर भडकले असून त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे. काही राज्यांमध्ये या दराने 200 रुपयांची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे केंद्र सरकार सतर्क झाले असून दर नियंत्रणासाठी नवी योजना क्रियान्वित करण्यात आली आहे. तसे दिशानिर्देश सर्व राज्यांना आणि प्रशासनाला देण्यात आले आहेत.
टोमॅटोच्या वाढत्या दरामुळे केंद्रीय ग्राहक कल्याण विभागाने सर्व सहकारी संस्था आणि नाफेड तसेच एनसीसीएफ यांना नवे दिशानिर्देश लागू केले आहेत. आंध्र प्रदेशात, जेथे टॉमेटोचे पीक मोठ्या प्रमाणात आले आहे, तेथून टॉमेटो खरेदी करण्याचा आदेश या संस्थांना देण्यात आला आहे. आंध्र प्रदेशप्रमाणेच कर्नाटक आणि महाराष्ट्रातूनही हे पीक खरेदी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
स्वस्तात विक्री करणार
खरेदी केलेल्या टोमॅटोंची विक्री केंद्र सरकारच्या किरकोळ विक्री दुकानांमधून करण्यात येणार आहे. सर्वप्रथम दिल्लीत याचा प्रयोग केला जाईल. त्यानंतर क्रमाक्रमाने अन्य महानगरांमध्ये याचा विस्तार केला जाईल. विकत घेललेले टामॅटो स्वस्त दराने सर्वसामान्यांना उपलब्ध करुन दिले जातील, अशी माहिती देण्यात आली.
त्वरित लागू होणार
केंद्र सरकारचे दिशानिर्देश त्वरित लागू करण्यात येतील. त्यासाठी यापूर्वीच यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. थोड्याच कालावधीत सर्व महत्वाच्या शहरांमध्ये अशा प्रकारे स्वस्त टॉमेटोची विक्री करण्यात येईल. या योजनेसाठी पुरेसा निधी नाफेड आणि अन्य संस्थांना देण्यात येईल. बाजारात दर उतरेपर्यंत ही उपाययोजन ा लागू राहील. बाजारात या पिकाचे दर कमी झाल्यानंतर या उपाययोजनेची आवश्यकता उरणार नाही, अशी माहिती ग्राहक कल्याण विभागाने दिली.
दोन महिने टंचाईचे
जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने टोमॅटोसाठी टंचाईचे असतात, असा अनेक वर्षांचा अनुभव आहे. यंदा पावसाळा लांबल्यामुळे जुलैतच मान्सूनच्या पावसाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. यामुळे टोमॅटोच्या दरांवर विपरीत परिणाम झाला. बाजारात आवक कमी झाल्याने दर भरमसाठ वाढले. तथापि, केंद्र सरकारने पुढाकार घेतल्याने येत्या काही दिवसात दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पावसामुळे या पीकाच्या वाहतुकीतही अडथळे येत आहेत, असे प्रतिपादन ग्राहक कल्याण विभागाने केले.
महाराष्ट्रातून पुरवठा
सध्या दिल्ली, मुंबई आणि तर महानगरांमध्ये गुजरात, मध्यप्रदेश आणि अन्य काही राज्यांमध्ये महाराष्ट्रातून पुरवठा होत आहे. सातारा, नारायणगाव आणि नाशिक येथून मोठ्या प्रमाणात या तीन राज्यांमध्ये आवक होत आहे. ही स्थिती या महिन्याच्या अखेरीपर्यंत राहील. त्यानंतर इतर राज्यांमधींल पीक बाजारात येण्यास प्रारंभ होईल आणि दर झपाट्याने उतरतील, अशी माहिती देण्यात आली.
उत्तराखंडात 250 रुपये
सध्या उत्तराखंड राज्यात टॉमेटोचे दर देशात सर्वात महाग आहेत. तेथे बुधवारी या भाजीचा दर 250 रुपये प्रतिकिलो असा होता. हा आतापर्यंतचा सर्वात अधिक दर आहे. उत्तर प्रदेशातही दर 150 रुपये आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि मध्यप्रदेशातही दर सर्वाधिक पातळीवर आहेत. इतके दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विविध राज्यसरकारांनीही दर खाली आणण्यासाठी त्यांच्या अधिकारातील उपाययोजना केल्या आहेत.
दर वाढण्याची कारणे
टॉमेटोचे दर इतक्या प्रमाणात वाढण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. यंदा उन्हाळ्याचे आणि उष्णतेचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे पीक म्हणावे तशा प्रमाणात आलेले नाही. पिकाला पाणी न देता आल्याने अनेक शेतकऱ्यांनी पीक अर्धवटच सोडून दिले. त्यामुळे टंचाई निर्माण झाली. लांबलेल्या पावसाळा आणि जुलैमध्ये उत्तर भारतात मोठा पाऊस यामुळे टॉमेटोवर परिणाम झाला. हे नाशवंत पीक असल्याने त्याची साठवणूक केली जात नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
केंद्र सरकारची तातडीची उपाययोजना
ड टॉमेटोचे दर कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांचे क्रियान्वयन
ड केंद्र सरकारच्या आणि इतर संस्थांच्या विक्री केंद्रातून उपलब्धता
ड नाफेड आणि एनसीसीएफला या पिकाची खरेदी करण्याची सूचना









