अनियमितता झालेल्या परीक्षा केंद्रांमध्ये कोणालाही 700 पेक्षा जास्त गुण नाहीत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच ‘एनटीए’ने शनिवार, 20 जुलै रोजी नीट-युजी परीक्षेचा शहर आणि केंद्रनिहाय निकाल जाहीर केला. एनटीएच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये उमेदवारांची ओळख उघड करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे वादग्रस्त गोध्रा आणि हजारीबाग केंद्रातून एकही उमेदवार टॉपर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 18 जुलै रोजी नीट वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी न्यायालयाने एनटीएला शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व उमेदवारांचे निकाल वेबसाइटवर अपलोड करण्याचे निर्देश दिले होते.
एनटीएने जाहीर केलेल्या सुधारित निकालानुसार वादग्रस्त केंद्रांतील एकाही विद्यार्थ्याला 700 पेक्षा जास्त गुण मिळालेले नाहीत. गेल्यावेळी जाहीर झालेल्या निकालात या केंद्रांच्या विद्यार्थ्यांना 720 गुण मिळाले होते. नीट-युजी परीक्षेत अव्वल आलेल्या 67 विद्यार्थ्यांवरून हा वाद सुरू झाला होता. परीक्षेचा निकाल 4 जून रोजी जाहीर झाला होता. सहा टॉपर विद्यार्थ्यांनी हरदयाल पब्लिक स्कूल, झज्जर, हरियाणा येथे नीट परीक्षा दिली होती. एकाच केंद्रातील दोन विद्यार्थ्यांना 718 आणि 719 गुण मिळाले होते. सुधारित निकालात या केंद्रातील 494 विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला असून त्यापैकी 33 विद्यार्थी 500 च्या वर तर आठ विद्यार्थी 600 च्या वर आहेत. अशीच अवस्था झारखंडची होती. येथील ओएसिस शाळेतील 22 विद्यार्थ्यांना 600 पेक्षा जास्त गुण असले तरी कोणालाही 700 पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले नाहीत. अशा स्थितीत यापूर्वी जाहीर झालेल्या निकालात टॉपर्स कसे झाले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हरियाणाचे झज्जर आणि गुजरातचे गोध्रा परीक्षा केंद्र या प्रकरणावरून वादात सापडले आहेत. झज्जर केंद्रातील सहा विद्यार्थ्यांनी परीक्षेत 720 गुण मिळवले होते. त्यामुळे हे केंद्र वादात सापडले होते. गोध्रा येथील एका परीक्षा केंद्रातून पाच राज्यांतील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या दोन्ही केंद्रांवर परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.









