महागाई भत्त्यात चार टक्के वाढ, लक्षावधींना लाभ
बस्तर / वृत्तसंस्था
केंद्रीय कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. याचा लाभ सध्या सेवेत असणारे जवळपास 52 लाख कर्मचारी आणि 60 लाख निवृत्तीवेतन धारकांना होणार आहे. वाढीव भत्ता जानेवारी 2023 पासून लागू केला जात आहे. ही घोषणा केंद्र सरकारच्या वतीने शुक्रवारी करण्यात आली.
शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱयांचा विचार करण्यात आला. त्यांना चार टक्के महागाईभत्ता वाढीव देण्याचे निर्धारित करण्यात आले. केंदीय कर्मचारी संघटनांनी या वाढीव भत्त्यासंबंधी समाधान व्यक्त केले. वास्तविक या भत्त्यात दरवर्षी वाढ करण्यात येते. तथापि, यावेळी अधिक वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.
महागाई भत्ता म्हणजे काय
वाढत्या महागाईच्या काळातही कर्मचाऱयांचे जीवनमान टिकून रहावे यासाठी मूळ वेतनाव्यतिरिक्त जी रक्कम कर्मचाऱयाला दिली जाते त्याला महागाई भत्ता असे म्हणतात. महागाई भत्ता केंद्र सरकारी कर्मचारी, तसेच निवृत्त केंद्रीय कर्मचारी यांना दिला जातो. सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱया कर्मचाऱयांनाही याचा लाभ मिळतो. खासगी संस्थांमध्येही महागाई भत्ता देण्याचा प्रघात आहे. याचा हिशेब मूळ वेतनानुसार केला जातो. तो दरवर्षी दोनदा जाहीर केला जातो. महागाई भत्ता निवृत्तीवेतनधारी कर्मचाऱयांनाही दिला जातो. त्यामुळे त्यांनाही वाढत्या महागाईप्रमाणे स्वतःचे जीवनमान राखता येते. महागाई भत्ता हा कित्येकदा मूळ वेतनापेक्षाही महत्वाचा मानण्याची प्रथा आहे. कोरोना काळात अर्थव्यवस्था मंदावल्याने महागाई भत्ता देण्यात आला नव्हता. मात्र नंतर तो वाढवून देण्यात आला. सध्याच्या प्रमाणानुसार केंद्रीय कर्मचाऱयांसाठी महागाई भत्त्याचे प्रमाण 42 टक्के इतके झाले आहे, अशी माहिती वित्त विभागाकडून देण्यात आली.









