वृत्तसंस्था/ श्यामकेंट, कझाकस्तान
युवा पिस्तूल नेमबाज राजकंवर सिंग संधूने 25 मीटर सेंटर फायर स्पर्धेत विजय मिळवून स्वत:ला वाढदिवसाची उशिरा भेट दिली, तर माजी विश्वविजेता अंकुर मित्तलने डबल ट्रॅपमध्ये सुवर्णपदक जिंकले. शुक्रवारी येथे झालेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने ऑलिंपिकमध्ये समाविष्ट नसलेल्या प्रकारांमध्ये विजय मिळवले.
अनुष्का भाटी (93), प्रणिल इंगळे (89) आणि हाफिज कॉन्ट्रॅक्टर (87) यांनी पदकप्राप्ती केल्याने महिलांच्या डबल ट्रॅपमध्येही भारताने क्लीन स्वीप केले. या तिघांनी एकूण 269 गुणांसह सांघिक सुवर्णपदकही जिंकले. 13 ऑगस्ट रोजी 23 वर्षांच्या झालेल्या संधूने अनुभवी सहकारी गुरप्रीत सिंग तसेच कोरियन आणि इराणी नेमबाजांच्या आव्हानाला मागे टाकत 583 (प्रिसिजन 289, रॅपिड 294) गुणांसह त्याच्या कारकिर्दीतील सर्वांत मोठे पदक जिंकले. 2018 आणि 2022 मध्ये कनिष्ठ विश्वचषकात अनुक्रमे कांस्य आणि रौप्यपदक जिंकल्यानंतर संधूचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील हे पहिलेच वरिष्ठ पदक आहे.
लष्करातील दिग्गज गुरप्रीत सिंग (579) चौथ्या स्थानावर राहिला, तर कोरियाचा जेक्युन ली (580) आणि इराणचा जावद फोरोफी (579) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. भारताने या स्पर्धेत सांघिक सुवर्णपदकही जिंकले. गुरप्रीतने सलग दुसऱ्या दिवशी दमदार कामगिरी केली. 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूलमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर आणि सांघिक प्रकारातही देशाला अव्वल स्थान मिळवून दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी या लष्कराच्या 37 वर्षीय नेमबाजाने संधू आणि अंकुर गोयलसह सेंटर फायरमध्ये 1733 गुणांसह आणखी एक मोठा विजय मिळवला.
2016 च्या रिओ गेम्समध्ये रॅपिड-फायर पिस्तूलच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या जवळ पोहोचलेल्या या ऑलिंपिकपटूने 579 गुण नोंदविले आणि संधू (583) आणि अंकुर (571) यांच्यासह मिळून 1733 गुण मिळवले, ज्यामुळे त्यांना सांघिक सुवर्णपदक मिळाले. व्हिएतनाम (1720) आणि इराण (1700) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.
भारताच्या सर्वोत्तम डबल-ट्रॅप नेमबाजांपैकी एक असलेल्या अंकुर मित्तलने 107 गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर कझाकस्तानच्या आर्त्योम चिकुलायेव (98) आणि अहमद अलाफसी (96) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. तथापि, भारताला या स्पर्धेत सांघिक कांस्यपदकाची तेवढी कमाई करता आली, ज्यामध्ये अंकुर (107), भानुप्रताप सिंग (82) आणि हर्षवर्धन कविया (75) यांचा समावेश राहिला.
दुसरीकडे, युवा नेमबाज मानिनी कौशिकने तिचे पहिले वैयक्तिक आंतरराष्ट्रीय पदक जिंकले. तिने महिलांच्या 50 मीटर रायफल प्रोन स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आणि त्याआधी संघाला रौप्यपदक मिळवून दिले. जयपूरची ही 24 वर्षीय नेमबाज 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये देखील भाग घेते. तिने 617.8 गुणांसह वैयक्तिक कांस्यपदक जिंकले. दक्षिण कोरियाच्या हाना इम 620.2 आणि युन्सेओ ली 620.2 या जोडीने अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले.
पुऊषांच्या 25 मीटर कनिष्ठ पिस्तूल स्पर्धेतही भारताने तिन्ही पदके पटकावली, ज्यामध्ये सूरज शर्माने (588) सुवर्णपदक जिंकले. अभिनव चौधरी (582) आणि मुकेश नेलावल्ली (576) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. या तिघांनी मिळून 1746 गुणांसह सांघिक सुवर्णपदकही जिंकले.









