मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची विधानसभेत माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
कळसा-भांडुरा योजनेला केंद्र सरकारने अनुमती दिली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी गुरुवारी विधानसभेत केली. बेळगाव येथे विधिमंडळाचे अधिवेशन होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने या महत्त्वाकांक्षी योजनेला हिरवाकंदील दाखविला आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्र्यांचे अभिनंदन केले.
कळसा-भांडुरासाठी चार दशकांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. गोव्याने या योजनेला हरकत घेतल्यामुळे आंतरराज्य जलवाद निर्माण झाला होता. हा वाद लवादासमोर आला. 2018 मध्ये लवादाने आदेश दिला. कर्नाटकने सादर केलेल्या सविस्तर आराखड्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. कळसातून 1.72 टीएमसी, भांडुरा योजनेतून 2.18 टीएमसी पाणी वळविण्यासाठी केंद्राने हिरवाकंदील दाखविला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.









