एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : भारतीय राजकीय इतिहासात बेळगावात महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 1924 च्या ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशनाची शताब्दी 26 आणि 27 डिसेंबर रोजी मोठ्या थाटात साजरी केली जाईल, असे एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शहरातील काँग्रेस भवन येथे मंगळवार दि. 17 रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल बोलत होते. ते पुढे म्हणाले, आज आपण मोठ्या अभिमानाने बेळगावात आलो आहोत. 27 डिसेंबर 1924 रोजी बेळगावात महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झाले. या अधिवेशनाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे सर्व काँग्रेसच्या पदाधिकारी व
कार्यकर्त्यांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले. महात्मा गांधीजींनी हिंसेविरुद्ध अहिंसेचा लढा देत प्रेम आणि समतेचा संदेश दिला. पण आज गरीब हा गरीबच आणि श्रीमंत हे श्रीमंतच होत चालले आहेत. आपण समानता, प्रेम याबद्दल बोलतो. 26 डिसेंबरपासून बेळगावात गांधी भारत कार्यक्रम होणार असून आम्ही या ऐतिहासिक संमेलनाचे आयोजन केले आहे. भारताच्या राजकीय इतिहासात बेळगाव काँग्रेस अधिवेशनाची ऐतिहासिक भूमिका आहे, असे ते म्हणाले. 26 डिसेंबर रोजी दुपारी एआयसीसी कार्यकारिणीची बैठक होणार असून 27 डिसेंबर रोजी काँग्रेसचा भव्य मेळावा होणार आहे.
केपीसीसी अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, सरकारच्यावतीने बेळगावातील सुवर्णसौधसमोर 26 डिसेंबर रोजी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी खासदार त्याचबरोबर सर्व आमदार आणि पक्षाच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला, पक्षाचे ज्येष्ठ नेते अजय माकन, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री आर. व्ही. देशपांडे, संतोष लाड, लक्ष्मी हेब्बाळकर आदी उपस्थित होते.









