विरोधी आमदारांची राज्यपालांकडे मागणी
पणजी : राज्यातील विरोधी पक्षीय आमदारांनी राज्यपाल पी. ई. श्रीधरन पिल्लई यांची राजभवन दोनापावला येथे जाऊन भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर कऊन गोव्यात जनगणना करण्याची मागणी केली. बिहारच्या धर्तीवर ती जनगणना असावी, अशी सूचनाही विरोधी पक्षीय आमदारांच्या शिष्टमंडळाने केली. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई हे मात्र त्यात सहभागी नव्हते. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले आणि त्यांनी राज्यातील विविध समस्यांवर चर्चा केली. निवेदन सादर केल्यानंतर राज्यपालांनी ते वाचून त्यावर विचार करण्याचे आश्वासन दिले. आलेमाव यांच्यासह कार्लुस फरेरा, एल्टन डिकॉस्ता, आपचे व्हॅन्झी व्हिएगश, क्रूझ सिल्वा, आरजीचे वीरेश बोरकर त्यात सहभागी होते. जाती धर्मातील सलोखा – शांती बिघडवण्याचे प्रयत्न होत असल्याबद्दल विरोधी पक्षीय आमदारांनी राज्यपालांकडे चिंता व्यक्त केली आणि हे प्रकार रोखण्यासाठी कडक कारवाई झाली पाहिजे असेही राज्यपालांना सांगण्यात आले.








