खानापूर : राज्य शासनाच्यावतीने सुरू असलेल्या शैक्षणिक आणि आर्थिक जनगणनेत तालुक्याच्या ग्रामीण भागात नेटवर्क सुरुळीत नसल्याने जनगणना अधिकाऱ्यांना दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नेटवर्क आणि सर्व्हर डाऊनमुळे सर्वेक्षण अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. खानापूर तालुक्यात एकूण 251 खेडी आहेत. त्यापैकी पश्चिम आणि दक्षिण भाग अती दुर्गम आणि जंगलने व्यापलेला आहे. तालुक्याची व्याप्ती मोठी असल्याने ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क सुरळीत नसल्याने सर्वेक्षण अधिकाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या सुरू असलेले जातीय आणि शैक्षणिक, आर्थिक सर्वेक्षण हे पूर्णपणे संगणकीकृत असून मोबाईलद्वारे माहिती संकलन करण्यात येत आहे.
त्यामुळे अधिकाऱ्यांना मोबाईल अॅपद्वारे प्रत्येक कुटुंबांची माहिती सर्व्हरला देणे गरजेचे आहे. मात्र ग्रामीण भागात सुरळीत नेटवर्क नसल्याने तसेच मुख्य सर्व्हर वेळोवेळी उपलब्ध नसल्याने सर्वेक्षण अधिकाऱ्यांना एका कुटुंबाला बराच वेळ द्यावा लागत आहे. तसेच अधिकाऱ्यांना एका दिवसात दहा कुटुंबांची माहिती संकलन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र नेटवर्क आणि सर्व्हर डाऊनच्या व्यत्ययामुळे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. नेटवर्क मिळविण्यासाठी सर्वेक्षण अधिकाऱ्यांना आसपासच्या भागात जावून सर्व्हरला माहिती द्यावी लागत आहे. मात्र सर्व्हर डाऊनमुळे माहिती वेळेत पाठवता येत नसल्याने अधिकारी हतबल झाले आहेत. त्यामुळे येत्या दहा दिवसात तालुक्यातील सर्वेक्षण पूर्ण होईल की नाही, याची शंका निर्माण झाली आहे.









