मागच्या दोन वर्षात जागतिक आणि भारतीय मनोरंजन क्षेत्र झपाटय़ाने बदलले आहे. 2020 साली जेव्हा संपूर्ण देशातील चित्रपट आणि नाटक विश्व ठप्प पडलं होतं तेव्हा एक क्षेत्र मात्र नवीन व्यावसायिक झेप घेत होतं. ते क्षेत्र म्हणजे ओटीटीवरील स्वतंत्र सिने विश्व. लॉकडाऊनमध्ये घरी बसलेल्या अनेक कुटुंबांचे मनोरंजन या ओटीटी माध्यमांवरील चित्रपट आणि मालिकांनी केले आहे. एवढंच नव्हे तर या माध्यमांमुळे अनेक प्रतिभावान अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यांची आपली ओळख देखील झाली.
एका वेळेला चित्रपट गृहात गेलं की एकच चित्रपट बघायला मिळतो. पण नेटफ्लिक्स, हॉटस्टार, ऍमेझॉन इत्यादीसारख्या ओटीटी माध्यमावर अनेक राज्यातील व विविध भाषेतील चित्रपट आणि मालिका आपल्याला एकाच ठिकाणी बघायला मिळत आहेत. यामुळे आपल्याला नव-नवीन विषयांवर मनोरंजक चित्रपट आणि मालिका बघायला मिळतातच पण त्याचबरोबर घराणेशाहीच्या पलीकडच्या कौशल्यासाठी ही माध्यमे एक नवीन व्यासपीठ झाले आहे.
कोणताही चित्रपट नाटय़गृहामध्ये प्रकाशित होण्याआधी, त्याला सेन्सॉर बोर्डकडून मान्यता मिळावी लागते. भारतामध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सेन्सॉर बोर्ड) ची स्थापना 1951 मध्ये झाली. सध्या सेन्सॉर बोर्ड चार प्रमाणपत्रे जारी करते. ‘यु’ प्रमाणपत्र मिळालं की तो चित्रपट अनिर्बंध सार्वजनिक प्रदर्शनासाठी आणि कुटुंबासाठी योग्य मानला जातो. तसेच, ‘यु – ए’ प्रमाणपत्र मिळालं की त्याचा अर्थ असा होतो की त्या चित्रपटामध्ये मध्यम हिंसा आणि लैंगिकता असते जी एखादे 12 वर्षाचे मुल आपल्या पालकांच्या देखरेखेखाली बघू शकतात. ‘ए’ प्रमाणपत्र मिळालेला चित्रपट फक्त 18 वर्षावरील प्रेक्षकच बघू शकतात कारण त्यात अति प्रमाणामध्ये हिंसा, व्यसनांचा वापर, चुकीची भाषा आणि लैंगिकता असते जी लहान मुलांसाठी योग्य नसते.
हे सर्व प्रमाणपत्र शक्मयतो सगळय़ांना माहिती असतात. पण त्या व्यतिरिक्त आणखी एक प्रमाणपत्र या बोर्डकडून दिले जाते, ते म्हणजे ‘एस’ प्रमाणपत्र. ‘एस’ प्रमाणपत्र मिळालेला चित्रपट सामान्य जनता बघू शकत नाही. केवळ त्याच्याशी संबंधित लोकांनाच (अभियंते, डॉक्टर, वैज्ञानिक इत्यादी) ते चित्रपट पाहण्याची परवानगी आहे.
या बोर्डच्या स्थापनेमागचा उद्देश म्हणजे निरोगी सार्वजनिक मनोरंजन सुनिश्चित करणे आहे. चित्रपटामध्ये हिंसक कृत्यांमध्ये मुलांचा सहभाग, मानसिक व शारीरिकरित्या अपंग असलेल्या लोकांवर अत्याचार, प्राण्यांवर अनावश्यक अत्याचार, अकारण हिंसा, क्रूरता किंवा भयपट, वंश, धर्म किंवा इतर सामाजिक गटाद्वारे अपमान इत्यादी सारखे विषय पारखूनच ही प्रमाणपत्रे चित्रपटांना दिली जातात.
भारतातील मनोरंजन क्षेत्र खूप मोठे असल्याने प्रेक्षक भारतीय अभिनेते/अभिनेत्री आणि चित्रपटांना आदर्श मानतात आणि त्यामुळे त्याचा भारतीय समाजावर मोठा प्रभाव पडतो. पण ज्या सेन्सॉर बोर्डला मोठं मोठे चित्रपटदेखील टाळू शकले नाही आहेत, तेच सेन्सॉर बोर्ड आज या ओटीटी माध्यमांवरील चित्रपटांना आणि मालिकांना लागू पडत नाही. म्हणूनच, जरी हे व्यासपीठ मनोरंजनाचे नवीन माध्यम झाले असले तरीही त्यावर प्रकाशित होणाऱया अनियंत्रित मजकूर एक चिंताजनक विषय होऊन बसला आहे. शिक्षेची भीती नसल्यामुळे अति हिंसक, अतिलैंगिक, अश्लील कथानक प्रसिद्ध होत चालले आहेत. फॅमिली मॅन, मिर्झापूर, सॅपेड गेम्स, स्क्वीड गेम, रान बाजार इत्यादी सारखे निराळे पण हिंसेने भरलेल्या मालिका आज ओटीटीवर सहज उपलब्ध आहेत. मोबाईल आणि संगणक या दोन्ही आज लहानांपासून ते मोठय़ांपर्यंत सर्वांसाठी अत्यावश्यक वस्तू आहेत. अशा वेळेला लहान मुलं त्यांच्या पालकांच्या गैरहजेरीत त्यावर काय करतात आणि बघतात हे कळू शकत नाही. सोशल मीडिया वर आणि इतर प्रसार माध्यमांवर जेव्हा अशा हिंसक मालिकेची सतत जाहिरात केली जाते, तेंव्हा ते बघायची इच्छा वाटणे साहजिक आहे. चुकीच्या वयात एवढे हिंसक, गुन्हेगारी आणि व्यसन आधारित चित्रपट/ मालिका बघितल्या तर त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या विचारांवर आणि व्यक्तिमत्वावर होऊ शकतो. पडद्यावर बघताना कितीही भव्य आणि छान वाटत असलं तरी प्रत्यक्ष जीवनात या सर्व विध्वंसक गोष्टींचा परिणाम काय होऊ शकतो याची कल्पना सामान्य प्रेक्षक करू शकत नाहीत. कित्येकदा एखाद्या आवडत्या कलाकाराच्या विध्वंसक भूमिकेने प्रभावित होऊन मुलं-मुली चुकीचे पाऊलदेखील उचलतात. या सगळय़ाचा त्या निर्मात्यांवर, दिग्दर्शकांवर किंवा नट नटय़ांवर काहीच परिणाम होत नाही.
त्यामुळे, एक निर्माता म्हणून आणि प्रेक्षक म्हणून सतर्क राहणे आवश्यक आहे. सर्जनशीलतेच्या नावाखाली आपण कोणत्याही प्रकारची अनावश्यक हिंसा, द्वेष, लैंगिक शोषण यांना प्रोत्साहन देऊ नये. सर्जनशीलता ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्टींपैकी एक आहे. त्याचा वापर करून कित्येक सुंदर, दुर्मिळ पण अद्वितीय गोष्टी लोकांपर्यंत पोहचवल्या जाऊ शकतात. फक्त हिंसा, लैंगिक शोषण आणि व्यसन दाखवलं तरच त्या परिस्थितीचं गांभीर्य कळते असे नाही. सगळं न दाखवता लोकांपर्यंत आपला संदेश पोहचवणे हीदेखील एक निराळी कला आहे जी उघडपणे सगळं दाखवण्यापेक्षा कठीण आहे. त्यामुळे, हा दृष्टिकोन निर्मात्याने एक आव्हान म्हणून स्वीकारला पाहिजे आणि ओटीटी क्षेत्रावरील मजकूर अधिक समावेशक केला पाहिजे.त्याचबरोबर, जरीही ओटीटी माध्यमांवरती चित्रपट बघायला कोणतेही तिकीट काढायला लागत नसले तरी प्रेक्षक म्हणून आपण त्याचा जितका प्रसार करू तितकी त्याची प्रसिद्धी वाढत जाते. त्यामुळे कोणताही मजकूर पाहण्याआधी, त्याची जाहिरात करण्याआधी नीट माहिती काढणे आवश्यक आहे. कदाचित, हळूहळू, ओटीटी माध्यमांना एक निष्पक्ष सेन्सॉर बोर्ड मिळेल जे प्रसिद्धीपेक्षा ही गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करेल आणि ज्यामुळे निर्मात्यांना अहिंसक आणि सामाजिकदृष्टय़ा निरोगी विषयांवर चित्रपट बनवण्याचे प्रोत्साहन मिळेल. पण तोपर्यंत, प्रेक्षक म्हणून ओटीटी माध्यमांवरील कोणताही मजकूर आंधळेपणाने मान्य करू नका, त्याचा खोलवर जाऊन अभ्यास करा. आणि एखादा मजकूर जर सामाजिकदृष्टय़ा विध्वंसक किंवा चिंताजनक वाटलं तर त्याविरुद्ध आवाज नक्की उचला!
-श्राव्या माधव कुलकर्णी








