तिमाही कंपन्यांची सुधारली कामगिरी : आगामी काळही लाभदायी
नवी दिल्ली :
केंद्र सरकारने पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर खर्च करण्यास सुरुवात केली असून सिमेंट निर्मात्या कंपन्यांना जून तिमाहीमध्ये चांगली कामगिरी करता आली आहे. सिमेंट कंपन्यांच्या सिमेंट विक्रीत गेल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून तिमाहीमध्ये दोन अंकी विक्रीमध्ये वाढ नोंदली गेली आहे.
सिमेंट निर्मात्यांना आर्थिक वर्ष 2026 मध्ये सिमेंट मागणी चांगली राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. अंतर्गत खर्चामध्ये झालेली कपात त्याचप्रमाणे डिझेलचे स्थिरदर यामुळे सिमेंट कंपन्यांना त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे शक्य झाले आहे. सिमेंट क्षेत्रातील आघाडीवरची सिमेंट निर्माती कंपनी अल्ट्राटेक सिमेंटने सदरच्या तिमाहीमध्ये 36.83 दशलक्ष टन इतक्या सिमेंटची विक्री केली आहे. विक्रीमध्ये जवळपास 9.7 टक्के वाढ झाली आहे. अलीकडेच कंपनीने इंडिया सिमेंटस् आणि केसोराम इंडस्ट्रीज यांचे अधिग्रहण केले होते. याचप्रमाणे अदानी समूहातील अंबुजा सिमेंटच्या सिमेंट विक्रीमध्ये सुद्धा चांगली वाढ पाहायला मिळाली आहे. सदरच्या तिमाहीमध्ये कंपनीने 18.4 दशलक्ष टन इतक्या सिमेंटची विक्री केली होती. आत्तापर्यंतच्या तिमाहींमध्ये पाहता जून अखेरचा तिमाही हा महसुलाच्या बाबतीत विक्रमी ठरलेला आहे. सदरच्या तिमाहीमध्ये कंपनीने 10 हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. याच पद्धतीने बिर्ला कॉर्पोरेशनच्या सिमेंट विक्रीमध्ये 9.36 टक्के वाढ झाली आहे. सदरच्या तिमाहीत बिर्लाने 4.79 दशलक्ष टन इतक्या सिमेंटची विक्री केली आहे.
यांच्या विक्रीत घसरण
दुसरीकडे श्री सिमेंटच्या सिमेंट विक्रीमध्ये मात्र काहीशी घसरण पाहायला मिळाली आहे. दालमिया भारत सिमेंटच्या विक्रीतही 5.8 टक्के घट दिसून आली. कंपनीने या अवधीत 7.4 दशलक्ष टन सिमेंटची विक्री केली होती. सरकारने पायाभूत सुविधांवर गुंतवणूक केल्याने बिहार, आंध्र प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र ही राज्ये सिमेंटच्या मागणीबाबतीत आघाडीवर राहिली आहेत. अलीकडच्या काळात सिमेंटच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीचा फायदा कंपन्यांच्या तिमाही नफ्यावर सकारात्मक परिणाम दिसला आहे. अखिल भारतीय स्तरावर पाहता सिमेंटच्या सरासरी किमती वर्षाच्या आधारावर पाहता जून 2025 मध्ये 355 रुपये प्रति 50 किलो बॅगकरता झालेल्या आहेत.









