चन्नम्मानगरच्या दोघांसह सात जणांवर एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वेगेटजवळ असणाऱ्या एका सिमेंटच्या व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी मच्छेजवळ ही घटना घडली असून आर्थिक व्यवहारातून अपहरण झाले. अपहरण करणाऱ्यांच्या स्कॉर्पिओ वाहनातून उडी मारून या युवकाने स्वत:ची सुटका करून घेतली आहे.
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात सात जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. लक्काप्पा भीमाप्पा जालीगिडदवर (वय 30) मूळचा रा. अक्कतंगेरहाळ, ता. गोकाक, सध्या रा. टिळकवाडी पहिले रेल्वेगेटजवळ असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक श्वेता व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.
लक्काप्पा जालीगिडदवर यांचा खादरवाडी क्रॉसजवळ सिमेंटचा व्यवसाय आहे. चन्नम्मानगर येथील किरण चौधरी व गजानन चौधरी हे दोघे व्यवसायाने चालक आहेत. त्यामुळे लक्काप्पाशी त्यांचा परिचय झाला. या दोघा जणांनी पॅसेंजर रिक्षा खरेदी केली आहे. 14 जानेवारी रोजी लक्काप्पा यांनी किरण चौधरीला 25 हजार रुपये तर गजानन चौधरीला 30 हजार रुपये ऑटोरिक्षाचे कर्ज भरण्यासाठी दिले होते.
बुधवार दि. 22 जानेवारी रोजी सकाळी गजानन चौधरीचा लक्काप्पाला फोन आला. तुमचे पैसे परत करायचे आहेत, त्यामुळे मच्छे पुलाजवळ या, असे सांगून त्यांनी बोलावून घेतले. आपल्या डिओ दुचाकीवरून लक्काप्पा मच्छे येथे पोहोचले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात तिखट टाकून चौघा जणांनी लाकडाने त्यांच्यावर हल्ला केला व गोवा पासिंगच्या स्कॉर्पिओ जीपमध्ये कोंबून त्यांचे अपहरण करण्यात आले.
अपहरणानंतर स्कॉपिर्ओमधून लक्काप्पाला हलग्याजवळ नेण्यात आले. तेथे रमेश नामक एका तरुणाला बोलावून घेण्यात आले. त्याच वाहनात कोंबून मारहाण करीत गोकाक तालुक्यातील केशप्पनट्टी येथे नेऊन एका घरात कोंडून ठेवण्यात आले. तेथून गोकाक तालुक्यातील मिडकनट्टी डोंगरावर नेऊन लाकूड व लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली.
याच डोंगरावर तलवार दाखवून जीवाची धमकीही देण्यात आली. पुन्हा तेथून केशप्पनट्टीला जाताना अक्कतंगेरहाळजवळ स्कॉर्पिओमधून उडी टाकून लक्काप्पाने आपली सुटका करून घेतली आहे. लक्काप्पाचा मोबाईल व दुचाकीही अपहरणकर्त्यांजवळ आहे. याप्रकरणी किरण चौधरी, गजानन चौधरी, रमेश, संजू, इरण्णा, परसू नारी, अरुण कोळवी सर्व रा. गुजनाळ, ता. गोकाक यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









