भाववाढीमागे कच्च्या मालाचे कारण पुढे : कंपन्या आहेत नफ्यात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींचा हवाला देत सिमेंट कंपन्यांनी एका महिन्यात त्यांच्या किमतीत 13 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. परिणामी, ईशान्येसह देशाच्या अनेक भागांमध्ये सिमेंटच्या 50 किलोच्या पोत्याची किंमत 400 रुपये आहे. मात्र, अनेक भागांत अजूनही 382 रुपयेच भाव आहे.
यामध्ये लक्षात घेण्यासारखा मुद्दा असा की ज्या सिमेंट कंपन्यांनी आयात केलेला कोळसा आणि पेटकोकच्या किमतीत वाढ झाल्याचे कारण सांगून सिमेंट महाग केले होते, ते स्वस्त झाले आहेत. शिवाय, गेल्या एका वर्षात कच्च्या मालाच्या किमती 50 टक्क्यांनी घसरल्या आहेत. तर सिमेंट एका वर्षात 65 रुपयांनी म्हणजे 20 टक्के महाग झाले आहे. यामुळे कंपन्यांचा ताळेबंद मजबूत झाला आहे. असे असूनही, सिमेंट कंपन्या त्यांच्या उत्पादन क्षमतेच्या 65 टक्के वापरत आहेत.
2023-24 च्या तिमाही निकालानुसार
2023-24 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत जाहीर झालेल्या निकालांनुसार, कंपनीचे मार्जिन 18 टक्क्यापर्यंत वाढले आहे. खर्च आणि उत्पादन क्षमता यातील फरकाने मार्जिन ठरवले जाते. दुसरीकडे, सर्वसामान्य लोकांसाठी घर बांधणे महाग झाले आहे.
सिमेंट कंपन्यांचा नफा वाढताच
मोतीलाल ओसवाल यांच्या अहवालानुसार, गेल्या एका वर्षात सिमेंट कंपन्यांचा महसूल 808 रुपयांवरून 905 रुपये प्रति टन झाला आहे. पेटकोकचा भाव गेल्या वर्षी 61 हजार रुपये प्रति टन होता जो यावर्षी 24 टक्क्यांनी कमी झाला आहे. दुसरीकडे, आयातीत कोळशाच्या किमती आता 135-140/टन डॉलर आहेत, ज्या ऑक्टोबर 2022 मध्ये 270/टन डॉलर होत्या. म्हणजेच ते स्वस्तदेखील आहे.
देशातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी अल्ट्राटेकच्या विक्रीत 16टक्के वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत सिमेंट कंपन्यांच्या नफ्यात 50 टक्के वाढ झाली आहे. वीज आणि इंधन खर्च कमी झाल्यामुळे मार्जिन सुधारल्याचे कारण सांगितले जात आहे. एसीसी आणि अंबुजासारख्या कंपन्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
2022 मध्ये देशात सिमेंटचा वापर 27.76 कोटी मेट्रिक टन झाला आहे. रेटिंग एजन्सी ईक्राच्या मते, 2023 मध्ये सिमेंटचे उत्पादन 38.9 कोटी मेट्रिक टनांपर्यंत पोहोचू शकते. कारण, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा या दोन्ही क्षेत्रातील मागणी सातत्याने वाढती राहिली आहे.
सिमेंट कंपन्यांच्या कामकाजात पारदर्शकतेची गरज
रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना क्रेडाईचे माजी अध्यक्ष सतीश मगर सांगतात की, सिमेंट कंपन्यांच्या कामकाजात पारदर्शकता आणण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत आहे. शेवटी, मागणी वाढत असताना कंपन्या उत्पादन वाढवत नाहीत हे कसे शक्य आहे? आरबीआयच्या मते, देशातील उद्योग त्यांच्या क्षमतेच्या 76 टक्क्यांपर्यंत वापरत आहेत. सिमेंट उद्योगांमध्ये ते 65टक्के प्रमाण आहे. कोविडनंतर मागणी वाढल्याने उद्योगांमधील उत्पादनही वाढले. तथापि, सिमेंट कंपन्यांनी क्षमता वापरात केवळ 5टक्के वाढ केली.









