नवी दिल्ली
सिमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी अल्ट्राटेक सिमेंट 13000 कोटी रुपये गुंतवणार असून याअंतर्गत आगामी काळात सिमेंट उत्पादन क्षमता वाढवली जाणार असल्याचे समजते. नव्या ताज्या गुंतवणुकीच्या माध्यमातून आगामी काळामध्ये वार्षिक तत्त्वावर 21.9 दशलक्ष टन इतकी सिमेंटची उत्पादन क्षमता वाढवली जाणार आहे. याअंतर्गत कंपनीचे एकूण उत्पादन 182 दशलक्ष टन इतके होणार आहे. आदित्य बिर्ला समूह अंतर्गत येणाऱ्या कंपनीकडून तिसऱ्या टप्प्यात कारखाना विकासाचे काम हाती घेतले जाणार आहे. याकरीता संचालक मंडळाने मंजुरीही दिली आहे.
काय म्हणाले कुमार मंगलम बिर्ला
आदित्य बिर्ला समूहाचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांनी सांगितले की, गेल्या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये कंपनीने 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यात पुन्हा आता 13 हजार कोटी रुपयांची भर घातली जाणार असून भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अल्ट्राटेक सिमेंटनेही महत्त्वाचे योगदान दिले आहे. भारताच्या संभाव्य आर्थिक विकासात योगदान देण्यात गृहबांधणी, रस्ते आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधा यांची भूमिका महत्त्वाची आहे.









