वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
जय जय श्रीरामच्या जयघोषात कंग्राळी बुद्रुक येथे सोमवारी अयोध्या येथे भगवान श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा व मंदिर उद्घाटन सोहळ्याचा आनंदोत्सव मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गावातील सर्व मंदिरे विद्युत रोषणाईने झगमगत होती. तर संपूर्ण गावभर भगव्या पताका, घरोघरी भगवे ध्वज, भगवान श्री रामाच्या प्रतिकृती असे एकंदर भगवेमय व राममय वातावरण दिसून येत होते. सोमवारी सकाळी ठीक 7 वा. गावचे ग्रामदैवत श्री मरगाई मंदिर येथून सुवासिनींची कलश मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक श्री कलमेश्वर मंदिर, श्री लक्ष्मी मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री सिध्देश्वर देवस्थान, श्री विठ्ठल मसणाई देवस्थान, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आदी मंदिरांना जाऊन देवस्थान पंचमंडळींच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले.
सुवासिनींनी भगव्या रंगाच्या साड्या परिधान केल्यामुळे संपूर्ण मिरवणूक भगवेमय झाल्याची दिसून आले. मिरवणूक शिवपुतळ्यासमोर आली. याठिकाणी भगवान श्रीराम, जय हनुमान मूर्तींचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. श्री कल्मेश्वर मंदिर आवारात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेताच रात्री 7 वा. गावातील सर्व मंदिरांमध्ये संपूर्ण गावभर घरोघरी दीपोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. रात्री 8 ते 10 वेळेत हभप गोपाळ पाटील (महाराज) यांचे कीर्तन निरूपण झाले. एकंदरीत श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा व श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमात गावातील विविध युवक मंडळे, महिला मंडळे, ग्रा. पं. सदस्य पतसंस्थांचे पदाधिकारी, वडीलधारी मंडळी व युवक सहभागी झाले होते.









