कंग्राळी बुद्रुक : अयोध्या येथील श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंदोत्सव कंग्राळी खुर्द गावामध्ये भक्तिभावाने अभूतपूर्ण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संपूर्ण गाव मंदिरे भगव्या पताका व भगवे झेंडे तसेच विद्युत रोषणाईने उजळून निघालेले दृष्य दिसून आले. या निमित्ताने सोमवारी सकाळी पहाटे 5 वा. पासून सर्व मंदिरांतून अभिषेक, काकडा आरती व विधीवत पूजन करून श्री रामाचे नामस्मरण करत भजनी गीते गात मिरवणूक काढण्यात आली.
अविस्मरणीय कलश मिरवणूक
श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने एकूण चार दिंड्यांमध्ये 5 हजारपेक्षा जास्त सुवासिनींनी पाण्याचे कलश डोक्यावर घेऊन मिरवणुकीमध्ये मोठा सहभाग दर्शविला. ज्योतीनगर चौक, नागनाथ मंदिर, रामनगर, सिध्दिविनायक मंदिर, श्री कलमेश्वर मंदिर, मारुती मंदिर, लक्ष्मी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नारायण मंदिर, महादेव मंदिर या ठिकाणी वेगवेगळ्या मंडळांनी कटआऊट्स उभे केले होते. सदर मूर्तीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन केले. हनुमान चालीसा पठण, आरती गायन व मंत्रजप करण्यात आला. काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी दुपारी तर काही ठिकाणी रात्री प्रसाद वाटप करण्यात आले. रात्री 10 पर्यंत मंदिरातून भक्तीगीतांचे भजन करण्यात आले. तसेच घरोघरी व मंदिरामध्ये दीपोत्सव करण्यात आले.









