वारकरी संप्रदायाचा हरी पारायण सोहळा उत्साहात संपन्न
कसबा बीड / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील कोगे येथे श्री पंत महाराज जन्माष्टमी दीपोत्सव व वारकरी संप्रदाय हरी पारायण सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला. ५८ वा जन्माष्टमी व ३० वा दत्तमूर्ती वर्धापन दिन उत्साहात व महाप्रसाद वाटप मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. विठ्ठल मंदिर, कोगे येथे शुक्रवारी हरी पारायण सप्ताहाची सांगता झाली. यावेळी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शनिवारी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या मंदिरातून श्रींची पालखी निघाली. ‘गुरुदेव दत्त’चा जयघोष करीत भजनी मंडळांच्या समवेत, धनगरी ढोल व पथकाच्या निनादात भव्य पालखी सोहळा मिरवणुक काढण्यात आली.
कोगे गावातच यावर्षी श्री गुरुचरित्र पाराण्याची सुरुवात झाली. भक्तांच्या इच्छेनुसार मंदिरावर कळस यावर्षी लोक सहभागातून कलश पूजन व कलशारोहणता कार्यक्रम प.पू. चिदानंद स्वामीजी काडसिद्धेश्वर महाराज यांचे शुभहस्ते करण्यात आला. मुख्य तीन दिवसीय सोहळ्यादरम्यान, विविध भजनी मंडळे आणि सोंगी भजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. विविध वाद्यांच्या गजरात, मंदिरापासून गावातील प्रमुख रस्त्यावरून भव्य पालखी मिरवणूक सोहळा काढण्यात आला. महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता.
या भजनी मंडळांच्या कार्यक्रम सोहळ्यासाठी सांगली, कोल्हापूर, मिरज, गारगोटी, गडहिंग्लज आदी भागातील भजनी मंडळांनी सहभाग घेतला. तसेच ढोलवादक, दांडपट्टा व मर्दानी खेळ असे कार्यक्रम झाले. सुमारे पाच ते सहा हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी कुंभी कारखाना संचालक प्रकाश पाटील, भगवान पाटील, माजी कुंभी कारखान्याचे संचालक कृष्णात पाटील, प्रकाश सखाराम पाटील, सरपंच आंबुबाई पाटील, उपसरपंच बाजीराव निकम, माजी उपसरपंच विश्वास पाटील, व सर्व सदस्य, ग्रामस्थ, भाविक व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.