काही तासात 85 हून अधिक संच लंपास : चोरटे परप्रांतीय?
बेळगाव : राज्योत्सवाच्या गर्दीत मोबाईल चोरांचाही मोठ्या प्रमाणात सुळसुळाट दिसून आला. बुधवारी रात्री 10 पर्यंत 85 हून अधिक जणांचे मोबाईल चोरण्यात आले आहेत. मिरवणूक पाहण्यासाठी आलेले अनेक तरुण महागडा मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार घेऊन पोलीस स्थानकात येतच होते. बुधवारी सकाळी 11 नंतर मोबाईल चोरीच्या घटना सुरू झाल्या. खासकरून राणी कित्तूर चन्नम्मा चौक, काकतीवेस, शनिवार खूट परिसरात या घटना घडल्या असून खिशात हात घालून मोबाईल पळविण्यात आले आहेत. वाढत्या घटना लक्षात घेऊन खडेबाजार पोलीस स्थानकात यासाठी स्वतंत्र टेबल लावण्यात आले होते.
डीजेच्या तालावर नाचताना आपल्या खिशातील मोबाईल कोणी पळविला? याची पुसटशी कल्पनाही यापैकी कोणाला आली नाही. आम्ही मिरवणूक पाहण्यासाठी आलो होतो. मात्र, मिरवणुकीत आपला मोबाईल चोरण्यात आला, असे सांगत तरुण रात्री उशिरापर्यंत खडेबाजार पोलीस स्थानकाकडे येत होते. मिरवणुकीत घडलेल्या मोबाईल चोरीच्या घटना लक्षात घेता परप्रांतीय गुन्हेगार बेळगावात आल्याचा संशय आहे. मार्केट पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 5 मोबाईल चोरीस गेले असून एका खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातून 80 मोबाईल चोरण्यात आले आहेत. रात्री 10 पर्यंतचा हा आकडा आहे. चोरीची तक्रार घेऊन पोलीस स्थानकात येणाऱ्यांचा ओघ सुरूच होता. मोबाईल चोरांच्या उपद्रवामुळे मिरवणूक पहाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून बेळगावला आलेले नागरिक पुरतेच हैराण झाले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दीतून एका दिवसात 35 हून अधिक मोबाईल चोरीच्या घटना घडल्या होत्या. 18 सप्टेंबर रोजी बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या गणेशभक्तांचे मोबाईल चोरण्यात आले होते. तीन दिवसांच्या काळात 50 हून अधिक मोबाईल चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या. आता राज्योत्सव मिरवणुकीच्या दिवशी केवळ काही तासात 85 हून अधिक मोबाईल चोरीस गेले आहेत.









