फुलांचे आयुष्य अल्पकाळ असते, तरीही ते चिरकाल आनंद देते. कारण फुले ही कामनेशिवाय उमलतात असे म्हणतात. त्यात फक्त देणे असते. फुलांचे जगणे नि:स्वार्थ असते. त्यामुळे त्याचा गंध टिकतो. कारण फुलांचे जगणे म्हणजे एक उत्सव असतो. एरवी कुठलाही जीव संपला की त्यातून फक्त दुर्गंध पसरतो.
पूर्वी बंगल्यांची वसाहत होती तेंव्हा अंगणात आणि परसदारी बगिचा असायचा. त्यात फुलांची झाडे नेहमी बहरलेली असत. सकाळी उठून निरनिराळ्या रंगांची फुले देवपूजेसाठी तोडून आणणे हे घरातील ज्येष्ठ नागरिकांचे आवडते काम असायचे. पूजेपूर्वी फुलांचे हार तयार करण्यात कौशल्य लागायचे. रंगसंगती, पानांचे गुच्छ आणि सुगंध यांचे एकत्रिकरण करून तयार केलेले फुलांचे हार देवांच्या फोटोला, मूर्तीला वाहिले की मन भरून कृतकृत्यता अनुभवणे हा आनंद असायचा. फुलांनी बहरलेले झाड बघितले की त्यात परमेश्वराचे दर्शन होते. मन प्रसन्न होते. कारण फुलांचे जगणे म्हणजे एक उत्सव असतो.
फुलांचे आयुष्य अल्पकाळ असते, तरीही ते चिरकाल आनंद देते. कारण फुले ही कामनेशिवाय उमलतात असे म्हणतात. त्यात फक्त देणे असते. ओशो रजनीश म्हणतात, फूल सकाळी उमलते, संध्याकाळी कोमेजून जाते. आत्ता होते आणि आत्ता गेले. पंचमहाभूतांशी खेळून धुळीत मिसळून गेले. अक्षय, खोल निद्रेत गेले. फुले आपली कुठलीही खूण मागे ठेवत नाहीत. ठसाही ठेवत नाहीत. म्हणूनच फूल तोडल्यानंतरही त्याचा सुगंध कायम राहतो. फुलांचे जगणे नि:स्वार्थ असते. त्यामुळे त्याचा गंध टिकतो. एरवी कुठलाही जीव संपला की त्यातून फक्त दुर्गंध पसरतो.
भगवान श्रीकृष्ण भगवद् गीतेच्या सातव्या अध्यायात म्हणतात, ‘पृथ्वीमध्ये मी पवित्र गंध आहे.’ पृथ्वी ही गंधवती आहे. श्रीसूक्तम्मध्ये म्हटले आहे की, ‘गंधद्वारा दुराधर्षा । नित्यपुष्टां करिषिणीं.’ मीमांसातीर्थ पं. श्रीपादशास्त्राr किंजवडेकर म्हणतात, ‘फुलांत सुगंध आहे हा शब्दप्रयोग भ्रामक आहे, कारण फूल सुगंध निर्माण करीत नाही. गंध पृथ्वीत नेहमी लहरत असतो. वस्तुत: सुगंध फुलात नसून फूल त्या विशिष्ट सुगंधाभोवती निर्माण झाले असते. ती फुले तो तो सुगंध अभिव्यक्त होण्याची फक्त माध्यमे आहेत. मोगऱ्याचे फूल वातावरणातला विशिष्ट सुगंध घेऊन प्रकट होते, तर गुलाबाची रचना तिथूनच मंद गंध घेऊन प्रकट होते. कडुनिंबाची फुले गुढीपाडव्याला खाण्याची पद्धत आहे. ती पृथ्वीमधला कडू गंध घेऊन अवतरतात.
प्रत्येक फुलाचे स्वत:चे असे वैशिष्ट्या असते. फुलांचे प्रकार नानाविध आहेत. त्यांची रचना गुंतागुंतीची आहे. निसर्गाचा हा चमत्कार जर समजून घेतला तर मन लवकर अंतर्मुख होण्यास मदत होते. जास्वंदाचे लाल फूल गणपतीबाप्पाला आवडते. पूजनीय पांडुरंगशास्त्राr आठवले म्हणतात, ‘लाल रंग क्रांतीचा सूचक आहे. नेता आणि तत्त्ववेत्ता यांना दैवी क्रांती प्रिय असते.’ शास्त्राrजी यातून फार मोठा अर्थ सुचवतात. क्रांती याचा अर्थ संपूर्णपणे बदल.
कालचा मागमूसही नाही. माणसाच्या अंतरंगातील क्रांती म्हणजे दैवी क्रांती. एकाच जन्मात पुन्हा एकदा नवा जन्म. अंतरंगात खोलवर दडून बसलेला मीपणा संपून जात तिथे फक्त सद्गुरूंची स्थापना होणे म्हणजे दैवी क्रांती. लाल फूल हे प्रतिकात्मक आहे. शुद्ध आचारातून अध्यात्म अस्तित्वात येते. म्हणून भारतीय संस्कृतीने देवताना विशिष्ट फुले वाहायला सांगितली असावीत. पांढरे शुभ्र फूल शिवशंकराला प्रिय आहे. शुभ्र रंग हा शुभशकुनी आहे. शिव कर्पूरगौर आहेत. शिवाचे हास्य शुभ्र आहे. पांढरे फूल हे भाग्यदायक आहे. पांढरा रंग हा वैराग्याचे प्रतीक आहे. शिवपूजा ही विरक्तीकडे नेत मोक्षवाटेवर आणून सोडते म्हणून शिवाला पांढरे फूल वाहतात. झेंडूच्या फुलांची माळ देवीच्या नवरात्रामध्ये महत्त्वाची आहे. झेंडू हे फूल दीर्घकाळ ताजे राहते. ते वेदनाशामक आहे. रूपाने सुंदर नसले तरी गुणवर्धक आहे. एक सत्य घटना आहे-एका प्रयोगशील शेतकऱ्याच्या शेतातले नुकतेच बहरू लागलेले, कोवळा बुंधा असलेले आंब्याचे झाड काही समाजकंटकांनी कापायला सुरुवात केली. आंब्याच्या झाडांची पाने तोरण करण्यासाठी त्यांना हवी होती. झाड अर्धे कापून झाले आणि चौकीदाराची चाहूल लागली त्याबरोबर ते चोर पळून गेले.
अर्धवट कापलेल्या त्या झाडाची शुश्रुषा शेतकऱ्याने केली. त्याने बुंध्यामध्ये झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांचा लगदा भरला आणि झेंडूंच्याच पानांची मलमपट्टी केली. निगुतीने काळजी घेतली आणि झाड जुळून पुन्हा उभे राहिले. झेंडू जखमा भरणारे फूल आहे म्हणून ते देवीला प्रिय असावे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात- ‘झाड जाणिजे फुले । मानस जाणिजे बोले । भोगे जाणिजे केले । पूर्वजन्मीचे?’ झाड कसे आहे ते झाडांच्या फुलांवरून कळते त्याप्रमाणे बोलण्यावरून माणसाची परीक्षा
होते.
फुले आणि माणसाचे मन यांचा जवळचा संबंध आहे. फूल हे एकटे असते. त्यातही रानफुलाचे एकटेपण माणसाला अंतरीचे गूज सांगून जाते. रानफूल आपल्यातच फुलून आपल्यातच मिटून जाते. पवन त्याचा मंद गंध दूरवर घेऊन जातो खरा; परंतु ते कुणाची वाट बघत नाही आणि कुणासाठी म्हणून फुलतही नाही. एका फुलामध्ये पंचमहाभूतांची शक्ती असते. अंतरंगात रमणारे, निखळ सौंदर्याने नटलेले रानफूल स्वत:मध्ये असलेल्या आत्म्याची जाणीव माणसाला करून देते. आनंदाचा शोध घेण्यात माणसाचे आयुष्य सरते. जग पालथे घातले तरी तो गवसत नाही. स्वत:चा शोध जेव्हा त्याला लागतो तेव्हाच माऊलींच्या शब्दांमध्ये ‘भितरी पालटू झाला’ ही अवस्था त्याला प्राप्त होते आणि तो आनंदात विलीन होतो. संत तुकाराम महाराज म्हणतात-‘मन हा मोगरा । अर्पुनी ईश्वरा । पुनरपी संसारा । येणे नाही? मन हे शेवंती । देऊ भगवंती । पुनरपी संसृती । येणे नाही ?’ मन हे उन्मन झाले की लौकिक जीवनातला संघर्ष संपतो. मन अमन झाले की सगळीकडे व्यापून उरतो तो परमात्मा. नंतर जिवाची येरझार संपते.
समर्थ रामदास स्वामींच्या शिष्या वेणास्वामी समर्थचरणी पूर्णविराम पावल्या तेव्हा स्वत: समर्थांनी त्या पवित्र देहास अग्नी दिला. समर्थांच्या सूचनेवरून वेणास्वामींचे समाधीवृंदावन बांधण्यात आले. नंतर तिथे एक चाफ्याचे झाड उगवले. ज्ञानप्रवृत्त करणारी ही घटना आहे. तिथे नेमके चाफ्याचे झाड का आले? चाफ्याला इंग्रजीत टेम्पल ट्री असे म्हणतात. तो सौम्य आणि विरक्त आहे. पानं येण्यापूर्वी त्याला फुलांचा बहर येतो. चाफा हा मुळात संन्यासी. स्वत:ची सावलीही तो झटकून टाकतो.
उन-वारा-पाऊस यांची तमा न बाळगता उघड्यावर जगणारा तपस्वी, विरागी चाफा आपल्या मंद सुगंधी दरवळाने मनात सात्विकता जागृत करतो. वेणास्वामींचे जीवन हे चाफ्यासारखे होते. त्यांना त्यांची सावली तरी कुठे होती? त्या तर सद्गुरूंमध्ये विलीन झाल्या होत्या. मनामनातील ऊर्जा जागवण्यासाठीच त्या जीवनात फुलून आल्या.
फूल ना फुलाची पाकळी म्हणून तरी स्वीकारा, असा वाक्प्रचार आपल्याकडे रूढ आहे. फुले जगण्याचा उत्सव करतात म्हणून फुलाच्या एका छोट्या पाकळीलाही मोल आहे. मातीत मिसळून मातीने दिलेला सुगंध तिचा तिला अर्पण करणारे छोटेसे फूल आत्मभानाचा क्षण जागृत करते एवढे मात्र खरे.
-स्नेहा शिनखेडे








