छत्रपती शिवाजी चौकात साखर, पेढे वाटप
प्रतिनिधी/कोल्हापूर
प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरीभोवती झालेले अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण गुरुवारी शिवप्रताप दिनी स्थानिक प्रशासनाने हटविले. त्याबद्दल हिंदुत्ववादी संघटनांतर्फे छत्रपती शिवाजी चौकात साखर, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या निर्णयाबद्दल शिंदे-फडणवीस सरकारने अभिनंदन करण्यात आले.
हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाला प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मारले.
त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या आदेशानुसार अफजलखानाची कबर त्या ठिकाणी बांधण्यात आली. परंतु या कबरीभोवती अनधिकृत बांधकाम होऊन मोठे अतिक्रमण झाले. हे अतिक्रमण काढण्याचे आदेश काही वर्षांपूर्वी न्यायालयाने दिले आहेत. परंतु यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. शिवप्रताप दिनी स्थानिक प्रशासनाने कारवाई करत हे अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त केले. त्याचा आनंदोत्सव हिंदुत्ववादी संघटनांतर्फे छत्रपती शिवाजी चौकात करण्यात आला. कार्यकर्त्यांनी नागरिकांना साखर पेढे वाटून आनंद द्विगुणित केला.
प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम हटविले, त्याप्रमाणे विशाळगड व गगनगडावरील अनधिकृत बांधकामांसह छत्रपती शिवाजी महारांनी बांधलेल्या 80 किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त करावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
यावेळी संभाजी साळुंखे, किशोर घाटगे, अवधूत भाट्य़े, सनी पेणकर, अनिल चोरगे, सुनिल पाटील, सौरभ निकम, शीतल सरनाईक, कैलास कोईंगडे, शीतल घाटगे, विश्वकर्मा व्हटकर, बापू वडगावकर, प्रमोद करंडे, रणजीत शिंगाडे यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.









