बेळगाव : ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन यासह विविध आसनांच्या सादरीकरणासह जिल्हा प्रशासन आणि शहर परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. प्रशासनातर्फे सुवर्ण विधानसौध येथे योग दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा सदस्य ईरण्णा कडाडी उपस्थित होते. ‘वसुधैव कुटुंबकम’ या घोषवाक्याला अनुसरून झालेल्या या कार्यक्रमात पहाटेपासूनच विविध शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, जिल्हा आयुष विभाग, महाऋषी योग फौंडेशन व अन्य संस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला.
यावेळी बोलताना ईरण्णा कडाडी यांनी भारताच्या ऋषी परंपरेपासूनच योग आचरणात आणला जातो. प्रत्येकाचे आरोग्य नीट रहावे यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो, असे सांगितले. यानंतर सर्वांनीच 45 मिनिटे विविध योगासने सादर केली. याचे संचलन इंदिरा जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. योग स्पर्धेमध्ये विविध बक्षिसे घेणाऱ्या पल्लवी नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जैन हेरिटेजच्या विद्यार्थ्यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच राष्ट्रीय पातळीवर योग स्पर्धेत भाग घेतलेले लव्हडेल शाळेचे विद्यार्थी निरज व नक्षत्र यांनी थरारक अशी योगासने सादर केली.
एसबीजी आयुर्वेदिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा विविध आसणे दाखविली. याप्रसंगी जिल्हा पंचायतीचे कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, अप्पर जिल्हाधिकारी के. टी. शांताला, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सोबरद, जिल्हा पंचायतीचे अधिकारी रवी बंगरप्पण्णावर, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. श्रीकांत सुनधोळी, तहसीलदार सिद्धराज भोसगी यांच्यासह अनेक अधिकारी, विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक उपस्थित होते. या शिवाय शहर आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये सकाळी 45 मिनिटांचा योगवर्ग घेण्यात आला. योगदिनाच्या निमित्ताने बुधवारी सकाळच्या सत्रात शाळा भरविण्यात आल्या. त्याचप्रमाणे पतंजली योग संस्था आणि अन्य अनेक संघ, संस्था, संघटना, महिला मंडळे, युवक मंडळे यांच्यावतीने योगासनांचा सराव करून योग दिन साजरा करण्यात आला.









