सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात संगीत मैफल : दोन दिवस संगीत कार्यक्रमांचे आयोजन
बेळगाव : संगीत कलाकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त दि. 25 व 26 रोजी सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात संगीत मैफल पार पडली. पंडित बंडोपंत कुलकर्णी संघाच्या आणि स्वर मल्हारच्यावतीने हा दिवस साजरा करण्यात आला. वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरुपा इनामदार यावेळी उपस्थित होत्या. बंडोपंत कुलकर्णी यांनी संगीत कलाकार संघाच्या स्थापनेपासूनचे कार्य आणि युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या कार्यपद्धतीची प्रशंसा केली. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाची सुरुवात ‘पूरिया धनाश्री’ या रागाने इचलकरंजीच्या त्रिगुण पुजारी यांच्या संवादिनी वादनाने झाली. विलंबित एकतालात राग विस्तार केल्यानंतर द्रुत तीनतालात गत वाजविली. ‘दे आता शरणागता’ हे नाट्यापद वाजवून सांगता केली.
‘श्री रागा’ने गायनास सुरुवात
दुसरे पुष्प गुंफणारे मुंबईचे ज्येष्ठ गायक पंडित राजाराम आंबर्डेकर यांनी ‘श्री रागा’ने आपल्या गायनास सुरुवात केली. या रागात एकंदर तीन बंदिशी प्रस्तुत केल्या. भरदार आवाज आणि आकर्षक बंदिशी यामुळे त्यांचे गायन रंगले. श्री रागानंतर आंबर्डेकर यांनी एक रागमालिका प्रस्तुत केली. रागमालेनंतर किरवाणी रागात एक बंदिशी त्यांनी पेश केली. आपल्यावरील भीमसेनजींच्या प्रभावाचा परिचय करून दिला, तो ‘पंढरी निवासा’ या अभंगाच्या गायनातून. ‘रंध्रात पेरली मी’ हे अभिषेकी बुवांनी प्रसिद्ध केलेले भावगीत आणि ‘काटा रुते कुणाला’ हे नाट्यागीत गाऊन त्यांनी समारोप केला. बंडोपंत कुलकर्णी यांनी कलाकारांना पुष्प दिले. सूत्रसंचालन करत रोहिणी गणपुले यांनी स्वागत करून संघाच्या संगीत कार्याबद्दल उपस्थितांना माहिती करून दिली.
दुसऱ्या दिवसाची संगीत सभा
दुसऱ्या दिवसाच्या संगीत सभेची सुरुवात प्राची गोरे, पांडुरंग देशपांडे, अॅड. रविंद्र माने, अध्यक्ष नंदन हेर्लेकर, सचिव प्रभाकर शहापूरकर, सदस्या रोहिणी गणपुले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर गायक योगेश रामदास यांनी जौनपुरी या रागाचा सुंदर विस्तार केला. रागदारीनंतर ‘जागा रे तुम्ही जागा’ हा अभंग गाऊन आपल्या गायनाची सांगता केली. अंगद देसाई यांनी योगेश यांना तबल्यावर तर संवादिनीवर रविंद्र माने यांनी व पूजा चव्हाण हिने तानपुऱ्यावर साथ दिली. सकाळच्या सत्रातील दुसरे पुष्प मुकुंद गोरे यांनी गुंफले. त्यांनी सालगवराळी रागामध्ये विलंबित झपताल आणि द्रुत तीनतालात बंदिशी सादर केल्या. त्यानंतर ‘राग मालन’ हा अप्रचलित राग विलंबित एकतालात व तीनतालात पेश केला. त्यांना तबल्यावर विशाल मोडक आणि हार्मोनियमवर वामन वागुकर यानी साथ दिली. ज्येष्ठ सदस्य जगन्नाथ धर्माधिकारी यांनी कलाकारांना पुष्प देऊन सन्मान केला.
राहुल मंडोळकर यांचे तबलावादन
सायंकाळच्या संगीत सभेची सुरुवात तबलावादक राहुल मंडोळकर यांच्या स्वतंत्र वादनाने झाली. पेशकारमधील आकर्षक आवर्तनं खुलवल्यानंतर तीश्र, मिश्र आणि चतुरस्र जातीच्या कायद्याचे प्रदर्शन राहुल यांनी केले. मध्य लयीत घरंदाज बंदिशी आणि फर्माईशी गती त्यांनी वाजवल्या. त्यांना लेहऱ्याची लयदार साथ सारंग कुलकर्णी यांनी दिली. रोहिणी गणपुले यांनी कलाकारांना पुष्प देऊन सन्मानित केले. शेवटचे पुष्प गुंफणाऱ्या डॉ. स्नेहा राजूरकर यांनी राग बागेश्रीमध्ये विलंबित तीनतालात अत्यंत शांत वातावरणामध्ये सुरू केला. हळूवार बढत करत सहजपणे लयकारीमध्ये प्रवेश करून त्यांनी सुंदर विस्तार केला. द्रुत तीनतालात तानक्रिया आणि विविध पलटे यांचे सुंदर प्रदर्शन त्यांनी केले. त्यानंतर पूर्वी थाटाचा मालवी त्यांनी पेश करून जयपूर गायन परंपरेची एक सुंदर झलक पेश केली. त्यानंतर त्यांनी झुला पेश केला. ‘एक सूर चराचर छायो’ हे प्रसिद्ध भजन आणि रामनामाचे गायन हे भैरवीमधले भजन सादर करून एक सुंदर कार्यक्रम केला. त्यांच्याबरोबर तबल्यावर विशाल मोडक आणि हार्मोनियमवर योगेश रामदास यांनी अतिशय समर्पक अशी साथ केली. तानपुऱ्यावर पूजा चव्हाण यांनी साथ दिली. त्यांना संघाचे अध्यक्ष नंदन हेर्लेकर यांनी पुष्प देऊन सन्मानित केले. प्रभाकर शहापूरकर यांनी आभार मानले. रोहिणी गणपुले यांनी सूत्रसंचालन केले.









